सचिनला या वेटरला भेटायचेय, तुम्ही मदत करणार?


क्रिकेटचा भगवान सचिन तेंडूलकर याने सोशल मीडियावर त्याच्या ट्विटर हँडलवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून त्याला एका वेटरला भेटायचे आहे आणि त्यासाठी सोशल मिडिया युजर्सनी त्याला मदत करावी असे आवाहन केले आहे.

सचिन म्हणतो फार पूर्वी कसोटी मालिका सुरु असताना त्यातील एक सामना चेन्नई येथे खेळला गेला होता. त्यावेळी संघ ताज कोरोमंडल हॉटेल मध्ये मुक्कामास होता. सचिनला कॉफी देण्यासाठी त्यावेळी एक वेटर त्याच्या खोलीत आला आणि त्याने सचिनला त्याची परवानगी असेल तर क्रिकेट संदर्भात काही बोलायचे आहे असे सांगितले.

सचिनने त्याला बोलायची परवानगी दिल्यावर या वेटरने सचिनला जे सांगितले ते ऐकून सचिन चकित झाला. या वेटरने सचिनला जे सांगितले त्यामुळे सचिनला खूप फायदा झाला. सचिन म्हणतो त्यावेळी कोपर दुखावले गेल्याने तो आर्म गार्ड वापरत असे. या कोपर दुखापतीबद्दल चर्चा करून हा वेटर म्हणाला, तुम्ही जो एल्बो गार्ड वापरत आहात त्यामुळे तुमच्या बॅटचा स्विंग बदलतो आहे. मी तुमचा चाहता आहे आणि तुम्ही खेळलेला प्रत्येक शॉट मी लक्षपूर्वक पाहतो त्यावेळी ही बाब माझ्या लक्षात आली.

सचिन म्हणतो, एल्बो गार्ड मुळे माझ्या बॅटचा स्विंग बदलतो हे मला माहित होते पण मी त्याकडे विशेष लक्ष दिले नव्हते. सचिननी ही गोष्ट लक्षात येणारा तू एकटाच आहेस असे त्या वेटरला सांगितले आणि त्याचा एल्बो गार्ड पुन्हा डिझाईन करून घेतला. सचिनला याच वेटरला पुन्हा भेटायचे आहे.

Leave a Comment