न्यूझीलंड ज्वालामुखी पिडीतांसाठी त्वचेची आयात


न्यूझीलंडच्या व्हाईट आयलंड ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर भाजलेल्या लोकांवर उपचार सुरु असल्याचे सरकारने सांगितले असून या उपचारांसाठी १२९२ चौरस मीटर मानवी त्वचा आयात केली जात असल्याचे सांगितले गेले आहे. सोमवारी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता आणि बुधवार पर्यंत यामुळे मृत्यू पडलेल्यांची संख्या १० वर गेल्याचे जाहीर केले गेले आहे. अजून २७ जण गंभीर जखमी असून त्यातील काही अतिदक्षता विभागात दाखल आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा या बेटावर ४७ पर्यटक होते.

भाजलेल्या रुग्णावर उपचार करत असलेले सरकारी डॉक्टर म्हणाले बहुतेक लोक ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या गरम वायूमुळे आणि राखेमुळे भाजले आहेत. २७ रुग्ण ३० टक्क्यांपेक्षा अधिक भाजले आहेत आणि त्याच्यावर त्वचारोपण करणे आवश्यक आहे. मात्र आमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात त्वचा नाही त्यामुळे १२९२ चौरस मीटर त्वचा आयात केली जात आहे. अमेरिकेतून त्वचा मागविली जात आहे त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलिया येथील टिश्यू आणि स्कीन बँकेलाही ऑर्डर दिली गेली आहे.

ज्वालामुखीचा उद्रेक अगदी थोडा काळ झाला मात्र त्यातून आकाशात १२ हजार फुट उंचीपर्यंत राख उडाली. पुन्हा उद्रेकाची शक्यता कमी आहे. हा ज्वालामुखी सक्रीय आहे आणि ३ डिसेंबरला वैज्ञानिकांनी त्याचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली होती पण त्याची तीव्रता कमी असेल आणि पर्यटकांना धोका नसेल असे वाटल्याने धोक्याचा इशारा दिला गेला नव्हता असे सरकारी अधिकारी म्हणाले.

Leave a Comment