जुळ्या देवींची मंदिरेही एक सारखी


उत्तर प्रदेशातील उन्नाव सध्या वाईट गोष्टींमुळे चर्चेत आहे. मात्र या गावाजवळ अगदी जवळ जवळ असलेली दोन देवी मंदिरे अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहेत. या मंदिरातील देवी जुळ्या बहिणी असल्याचे मानले जाते आणि विशेष म्हणजे ही दोन्ही मंदिरे, त्यातील मूर्ती अगदी सारख्या आहेत. यातील एका देवीची स्थापना परशुरामाने केली असून तिला दुर्गा किंवा कुसुम्भी माता म्हटले जाते तर दुसऱ्या देवीची स्थापना रामसीतेचा पुत्र कुश याने केली असून तिला कुशाहारी माता असे म्हटले जाते. या देवी मंदिरात देशातील एकमेव छत्रधारी घोड्यावर स्वार असलेली लव कुश मूर्ती असून पुरातत्व विभागाने हे मंदिर संरक्षित घोषित केले आहे.

पैकी दुर्गा मंदिर उन्नाव जवळच्या भितारेपार जवळ आहे. याची कथा अशी सांगतात परशुरामाचे वडील जमदग्नी ऋषी यांच्या आश्रमात कामधेनु होती ती एका राजाने दान म्हणून मागितली. ऋषींनी त्याला नकार देताच राजपुत्रांनी जमदग्नी ऋषींना ठार केले. वडिलांच्या वधाची बातमी येताच परशुरामाने परत येऊन प्रथम दुर्गेची स्थापना केली. तिची पुजाअर्चा केली आणि नंतर राजा सह सर्व त्याच्या सर्व वंशाचा नाश केला. जेव्हा या मंदिराची माहिती उजेडात आली तेव्हापासून तेथे नित्य पूजा अर्चना सुरु झाली. या देवीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे.

कुशाहारी मातेविषयी अशी माहिती मिळते की रामाच्या आज्ञेवरून सीतेला वनवासात सोडण्यासाठी लक्ष्मण जात असताना वाटेत त्याला एक सरोवर लागले. तेथे पाणी पिण्यासाठी तो थांबला तेव्हा सरोवरातून मला बाहेर काढ असे आवाज आले. लक्ष्मणाला तेथे देवीची मूर्ती सापडली जी त्याने एका वडाच्या झाडाखाली स्थापन केली. सीतेला वाल्मिकी आश्रमात सोडून लक्ष्मण परत अयोध्येला गेला. रामाच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा अडविण्यासाठी लव कुश यांच्यासह वाल्मिकी आणि सीता आली तेव्हा झाडाखालची मूर्ती सीतेला दिसली आणि तिने कुशाला देवीची स्थापना कर असे सांगितले आणि स्वतः देवीची पूजा केली. या मंदिराजवळ अतिशय सुंदर सरोवर आहे. तेथील जल पवित्र असल्याचे मानतात. या देवीच्या दर्शनाने रोगमुक्ती होते असा विश्वास आहे.

Leave a Comment