आता ‘या’ पक्षासाठी रणनीती तयार करणार ‘PK’


नवी दिल्ली : आता अवघ्या काही महिन्यांवर दिल्ली विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली असून ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाने देखील यासाठी तयारीही सुरू केली आहे. देशभरात रणनितीसाठी ‘राजकीय चाणक्य’ म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर हे आता आम आदमी पक्षासाठी काम करणार आहेत. याबाबतची माहिती खुद्द अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन दिली आहे. ‘अबकी बार ६७ पार’ हा नारा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही दिला आहे.


आमच्यासोबत आय-पॅक जोडली गेली असल्याचे सांगताना अत्यंत आनंद होतो. तुमचे स्वागत असल्याचे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. प्रशांत किशोर यांची आय-पॅक म्हणजेच इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी ही संस्था आहे. निवडणुकीचे नियोजन या संस्थेकडून केले जाते. एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही प्रशांत किशोर यांनी काम केले आहे. त्यांची देशातील प्रसिद्ध निवडणूक रणनितीकारांमध्ये गणती केली जाते. पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी प्रशांत किशोर यांनी काम केले होते.

अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच याबाबतची माहिती आय-पॅककडूनही देण्यात आली. आम्ही पंजाबच्या निवडणुकीत ज्याचा सामना केला, तो आम आदमी हा सर्वात मजबूत विरोधी पक्ष होता. तुमच्याशी जोडले गेल्याबद्दल आम्हाला आनंद असल्याचे ट्विट आय-पॅककडून करण्यात आले आहे.

Leave a Comment