नामदेव महाराज शास्त्रींची धनंजय मुंडेंना ‘आज्ञा’


मुंबई – परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव करत आमदार झालेल्या धनंजय मुंडे यांची भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी स्वतः यांची भेट घेऊन मंत्री होऊन आपण भगवान गडावर ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घ्यायला या, असे निमंत्रण दिले आहे. याबाबतची माहिती स्वतः आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिली आहे.


अनन्यसाधारण असे सबंध मराठवाड्याचे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या भगवान गडाचे महत्त्व आहे. आधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबा यांच्या वास्तव्याने पावन झालेला भगवानगड दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना याच ठिकाणी राजकीय हेव्यादेव्यांमुळे येण्यास मज्जाव करण्यात आला होता. परंतु, आज स्वतः महंत नामदेव शास्त्री यांनीच मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद दिले. मुंडे यांनी ‘संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ असे म्हणत महंत नामदेव शास्त्रीन्नी आपल्याला गडावर दर्शनाला येण्याची ‘आज्ञा’ केल्याचे म्हटले आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गडावर महंत नामदेव शास्त्री यांनी राजकीय भाषणास बंदी घातल्याने गडावरून राजकीय वादंगाचे काहूर माजले होते. धार्मिक सुसंस्कृतपणा जपण्यासाठी धनंजय मुंडे हे प्रसिद्ध असल्यामुळे नामदेव शास्त्री यांनी स्वतः मुंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा परळीतील विजयासाठी गौरव करत आशीर्वाद दिले तथा मुंडेंना भगवानगडावर येऊन संत भगवानबाबांचे आशीर्वाद घेण्याचे निमंत्रण दिल्यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Comment