दलालांशिवाय नाशिकच्या शेतकऱ्यांची थेट मुंबईत पालेभाज्यांची विक्री

(Source)

शेतकऱ्यांना शेतात पिकलेल्या फळे, पाल्या-भाज्या या बाजार समिती अथवा मार्केटमध्ये पोहचवण्यासाठी दलालांच्या माध्यमातून विकाव्या लागतात. शेतकऱ्यांचा माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्याआधी तो दलाल, व्यापारी अशा अनेकांच्या मार्गातून जात असतो, या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचे योग्य ते मुल्य देखील मिळत नाही. मात्र आता या सर्व गोष्टींवर मात करून नाशिक येथील एका शेतकऱ्यांचे गटाने थेट आपला सेंद्रीय माल मुंबईतील ग्राहकांना विकण्यास सुरूवात केली आहे व या ताज्या, सेंद्रीय मालाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

द बेटर इंडियाच्या वृत्तानुसार, नाशिक येथील ‘वसुंधरा सेंद्रीय शेतमाल संपादक शेतकरी’ गटाशी 200 पेक्षा अधिक शेतकरी जोडलेले आहेत. हा गट आठवड्यातून 2-3 दिवस खास ताज्या मालाचा बाजार मुंबईत भरवत असतात.

(Source)

या गटाशी जोडलेले शेतकरी भागवत सांगतात की, येथे कोणत्याही प्रकारच्या पाले-भाज्या वाया घालवल्या जात नाही. आम्हाला सर्वसाधारण पालेभाज्यांच्या किंमतीच्या तुलनेत केवळ 20 टक्के अधिक पैसे मिळतात. विशेष गोष्ट म्हणजे येथील लोक नैसर्गिकरित्या उगवलेली फळे, पाले-भाज्या घेऊन जातात.

2016 साली सरकारच्या ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेने’ (ATMA) काही शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीबद्दल प्रशिक्षण दिले होते. भागवत यांच्या टीमने देखील प्रशिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी मार्केटिंग तंत्रज्ञान आणि दलालांशिवाय विक्री करण्याची पद्धत देखील शिकून घेतली.

(Source)

भागवत यांनी सांगितले की, मला माझे उत्पादन नेहमीच शहरी भागात विकायचे होते आणि यासाठी मुंबई सर्वात प्रथम निवड होती. म्हणून मी शेतकऱ्यांचा एक ग्रुप तयार केला आणि मुंबईमध्ये उत्पादन विक्रीसाठी कोणी मदत करेल का याचा शोध घेऊ लागलो.

अनेक दिवस शोध घेतल्यानंतर अखेर निवृत्त लष्कर अधिकारी जोसेफ पिंटो यांच्याशी त्यांची भेट झाली. जोसेफ यांच्या शरण सेंद्रीय फार्मिंग मार्केटच्या मदतीने तीन वर्षांपुर्वी या शेतकऱ्यांच्या गटाने स्टॉल टाकला. तेव्हापासून हे शेतकरी दर रविवारी आपला माल विकण्यासाठी नाशिकवरून मुंबईला येतात.

(Source)

भागवत यांनी आपल्या ग्राहकांशी संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केला आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ते बाजाराच्या दिवशी माल घेऊन येत असतात.

भागवत यांनी सांगितले की, आम्ही सर्वसाधारण किंमतीपेक्षा केवळ 3 ते 4 रुपये अधिक घेतो. प्रत्येक शेतकरी दिवसाला 2000 रुपयांची कमाई करेल याची आम्ही काळजी घेत असतो. भागवत यांच्या सेंद्रीय पालेभाज्यांवर त्यांचे ग्राहक देखील खूष आहेत.

Leave a Comment