तान्हाजीमधील ‘त्या’ दृश्यावर मालुसरे यांच्या 14 व्या वंशजांचा आक्षेप


नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या 14 व्या वंशजांनी या चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. तान्हाजी मालुसरे यांना या ट्रेलरमधील एका दृश्यात साखळदंडाने बांधण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या 14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी याच दृश्यावर आक्षेप घेतला असून प्रसाद मालुसरे यांनी या चित्रपटातील ते दृश्य वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे. अजय देवगण याने या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात काजोल, ल्युक केनी, सैफ अली खान यांच्याही भूमिका आहेत.

यापुढच्या काळात तान्हाजी या चित्रपटात दाखवण्यात येणारा इतिहास हा तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास म्हणून ओळखला जाईल. तान्हाजी मालुसरे यांना चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात साखळदंडाने बांधण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. पण तान्हाजी मालुसरे यांच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात असा प्रसंग घडल्याचे कुठेही वाचण्यात किंवा ऐकण्यात न आल्यामुळे चित्रपटातून हा प्रसंगच वगळला जावा. त्याचबरोबर कोणतीही आक्षेपार्ह दृश्ये या चित्रपटात नाहीत ना? याचीही खात्री झाली पाहिजे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना दाखवण्यात यावा किंवा चित्रपटाची स्क्रिप्ट वाचनासाठी देण्यात यावी, अशीही मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली आहे.

Leave a Comment