मीच काढली मुंडेंच्या स्मारकाची वर्कऑर्डर, मग ठाकरेंकडे जायची काय गरज


मुंबई : गोपीनाथ मुंडे आमच्या पक्षाचे नेते होते. आमच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांच्या स्मारकाच्या निविदांचे काम झाले. पण निवडणुकी दरम्यान आचारसंहितेमुळे त्यांच्या स्मारकांचे काम थांबले होते. मग त्यांच्या स्मारकाची ४६ कोटी रुपयांची वर्कऑर्डरही चार दिवसांचा मुख्यमंत्री असताना मीच काढली असल्यामुळे या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एकनाथ खडसे यांना जाण्याची गरज नसल्याचा प्रतिहल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. या कामाला ठाकरेंनी स्थगिती दिली असेल तर मग त्यांच्याकडे जाणे ठीक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. त्यांनी विविध एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली.

फडणवीस यांनी भाजपमध्ये ओबीसींवर अन्याय होत असल्याच्या आरोपाचे खंडन करताना मागच्या आघाडी सरकारच्या तुलनेत सर्वाधिक ओबीसी नेत्यांना आम्ही मंत्रिपदे दिली. माझ्या सरकारमध्ये ३५ मंत्री मराठा, ३७ ओबीसी तर १८ एससी/ एसटी समाजाचे होते. आम्ही ओबीसी नेत्यांना महत्त्वाची खातीही दिली, पण केवळ ते ओबीसी होते म्हणून नव्हे, तर कार्यक्षम आहेत म्हणून ही जबाबदारी दिल्याची पुष्टिही फडणवीस यांनी जोडली.

आमच्या पक्षाच्या पंकजा मुंडे नेत्या आहेत. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करत आहे. जी काही नाराजी त्यांची होती, त्यांनी ती वरिष्ठ नेत्यांकडे बोलायला हवी. माझा पंकजा यांच्याशी नेहमीच संवाद असतो. मी त्यांच्याशी तीन- चार दिवसांपूर्वी बोललो. चंद्रकांतदादाही बोलले. आम्ही यापुढेही त्यांच्याशी बोलत राहू. त्यांनी राज्यात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करण्यास हरकत नाही, पण पक्षातील नेत्यांनी पक्षाचे काम हे भाजपच्याच व्यासपीठावरून करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पक्षातील नाराजी बोलण्यासाठी मुंडेंच्या जयंतीचे व्यासपीठ हे नसल्याची टीकाही त्यांनी पंकजा मुंडे व खडसे यांच्यावर केली.

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावरील मेळाव्यात आमच्या सरकारमध्ये विरोधी पक्षनेते (धनंजय मुंडे) प्रबळ झाल्याचा आरोप केला होता. फडणवीस त्याचे खंडन करताना म्हणाले, असे म्हणणे चुकीचे आहे. उलट आम्ही विरोधी पक्षनेतेपदी असतानाही धनंजय यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे काम केले. पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय यांनी ज्या ज्या वेळी आरोप केले, त्या त्यावेळी मी आणि चंद्रकांतदादा सभागृहात त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले.

मुख्यमंत्रिपदासाठी मोदी, अमित शहा यांनी माझे नाव जाहीर केले होते. त्यामुळे प्रचारात ‘मी पुन्हा येईन’ असे मी म्हणत होतो. याचा अर्थ पुन्हा आमचेच सरकार येईल, असा होता. पक्षनेतृत्वाने पुन्हा माझेच नाव पुढे केल्यावर ‘मी पुन्हा म्हणेन’ असे म्हणेनच, यात गैर काय, असे फडणवीस म्हणाले.

फार काही काळ महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही. कालपर्यंत शिवसेना आमचा मित्र होता, पण यावेळी त्यांनी आमची फसवणूक केली. चर्चेची दारेही त्यांनीच बंद केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना आजही आम्हाला जवळचा आहे. जर त्यांनी भविष्यात एकत्र येण्यासाठी हाक दिली तर त्याचा विचार केला जाईल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

जेव्हा दाऊदसोबत संभाषणाचे खडसेंवर आरोप झाले तेव्हा मी १२ तासांत चौकशीचे आदेश एटीएसला दिले. त्यांना क्लीन चिटही मिळाली. केंद्रीय नेत्यांनी खडसेंचे तिकीट कापले. पण, अन्याय करायचा असता तर त्यांच्या मुलीला तिकीट दिले नसते. खडसेंचा बेधडक बोलायचा स्वभाव आहे. पण, स्वत:चे नुकसान होईल असे त्यांनी बोलू नये, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

पाठिंबा देण्याची इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली होती. याबाबत शरद पवारांनाही कल्पना दिली असल्याचे ते म्हणाले होते. आम्ही विश्वास ठेवला व सरकार स्थापन केले. आमचा हा ‘गनिमी कावा’ होता. पण, तो फसल्यामुळे आज टीका होत आहे. जर यशस्वी झाला असता तर कौतुक झाले असते. अजित पवार या गनिमी काव्याचे नायक व मी सहनायक असल्याचे फडणवीस म्हणाले.

अमृता फडणवीस यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून स्वत:चे निर्णय त्या स्वत: घेतात, स्वत:च ट्विटही करतात. माझेही त्या ऐकत नाहीत. त्यांना त्याची किंमतही मोजावी लागली. त्या अनेकदा ट्रोल देखील झाल्या, त्यांनी शिवसेनेवर ट्विटरद्वारे टीका केली, ती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत नव्हतीच. तुम्ही जर वृक्षतोडीमुळे आरेतील कारशेडला स्थगिती देता तर मग स्मारकासाठी वृक्षतोड का?’ एवढाच प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. पण काही राजकीय लोकांनी खालच्या पातळीवर टीका केल्याची खंत देवेंद्र यांनी व्यक्त केली.

Leave a Comment