या सामाजिक कार्यामुळे दीपिका पादुकोणला मिळाला पुरस्कार


आपल्या अभिनयासोबतच सामाजिक कार्यामुळेही बॉलीवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पादुकोण ही ओळखली जाते. तिने काही महिन्यांपूर्वीच मानसिक आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यासाठी २६ वा वार्षिक क्रिस्टल पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे.


दीपिकाने हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. डिप्रेशन या आजारामुळे दरवर्षी ३० कोटीपेक्षा अधिक लोकग्रस्त होतात. डिप्रेशनसाठी आरोग्याबाबत दुर्लक्ष आणि मानसिक तणाव या गोष्टी कारणीभूत असतात. यामुळे इतरही आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे समाजात मानसिक आरोग्य जनजागृतीची गरज असल्याचे दीपिका यावेळी म्हणाली.


तनाव, काळजी आणि मानसिक रोगांचा सामना करणाऱ्या जगभरातील लोकांना हा पुरस्कार मी समर्पित करत असल्याचे ती म्हणाली. तिच्या कामाबाबत बोलायाचे झाले तर, लवकरच ‘छपाक’ या चित्रपटाद्वारे दीपिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती यामध्ये अ‌ॅसिड हल्ल्यातून पुन्हा नवी भरारी घेणारी लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच रिलीज करण्यात आला होता. ट्रेलरनंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाचीही आतुरता आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment