ब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा बोरिस जॉन्सन

(Source)

ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाने बहुमत मिळवले आहे. अधिकृत एक्झिट पोलमध्ये देखील पक्षाला 368 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आतापर्यंत 650 जागांपैकी 595 जागांचे निकाल जाहीर झाले असून, बोरिस यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाने आतापर्यंत 326 जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा गाठला आहे.

काही महिन्यांपुर्वीच पंतप्रधान झालेले बोरिस यांना अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. मात्र ब्रेक्झिटचे महत्त्व ब्रिटनच्या नागरिकांना पटवून देण्यात त्यांना यश आले.

यूएक्सब्रिझ या आपल्या मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर ते म्हणाले की, ही एक ऐतिहासिक निवडणूक होती. आपण ब्रिटिश नागरिकांच्या मतांचा आदर केला पाहिजे. या बहुमतामुळे आम्ही ब्रेक्झिटचा निर्णय नक्कीच तडीस नेऊ.

तर दुसरीकडे लेबर पार्टीला केवळ 191 जागांवर विजय मिळवता आला आहे. 1935 नंतरचा पक्षाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. या पराभवानंतर पक्षाचे नेते जेरेमी कार्बिन यांनी यापुढील निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणार नसल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बोरिस यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment