ब्रिटनच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांचा मोठा विजय

(Source)

ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. पुन्हा एकदा बोरिस जॉन्सनच ब्रिटनचे पंतप्रधान असणार आहेत. या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्ष आणि लेबर पक्षातील अनेक भारतीय वंशांच्या खासदारांनी विजय मिळवला आहे.

मागील संसदेतील सर्व खासदारांना यंदा देखील विजय मिळवण्यात यश आले आहे. याचबरोबर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे गगन महिंद्रा आणि क्लेअर कॉटिनिहो आणि लेबर पक्षाच्या नवेंद्रू मिश्रा यांनी पहिल्यांदा विजय मिळवला आहे.

मूळ गोव्याच्या असलेल्या कॉटिनिहो विजयानंतर म्हणाल्या की, आता ब्रेक्झिट पुर्ण करण्याची वेळ आली आहे. त्याचसोबतच चांगले शिक्षण, हॉस्पिटल आणि सुरक्षेसाठी पोलीस या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. त्यांना सर्रे ईस्ट टोरी-हेल्ड मतदार संघातून 35,624 मते मिळाली व त्यांचा 24,040 मतांनी विजय झाला. याशिवाय गगन महिंद्रा यांनी देखील हेर्टफोर्डशायर साउथ वेस्ट मतदारसंघातून 14,048 मतांनी विजय मिळवला.

तसेच, भारतीय वंशाच्या माजी गृहसचिव प्रिती पटेल यांनी देखील या निवडणुकीत विजय मिळवला. त्यांनी इस्सेएक्स येथील विथाम मतदार संघातून 24,082 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.

याशिवाय प्रिती पटेल यांचे कॅबिनेटमधील सहकारी आणि इंफोसिसचे सहसंस्थापक नारायण मुर्ती यांचे जावाई रिशी सुनक यांनी देखील 27,210 मतांनी विजय मिळवला आहे. माजी अंतरराष्ट्रीय विकास मंत्री अलोक शर्मा यांनी 24,393 मतांसह विजय मिळवला.

भारतीय वंशाचे शैलेष वारा यांनी नॉर्थ वेस्ट कॅम्ब्रिजशायर मतदारसंघातून 25,983 मतांनी विजय मिळवला तर गोव्याच्या सुईला ब्रेवर्मन यांनी 26,086 मतांच्या फरकांनी विजय मिळवला.

लेबर पक्षाला या निवडणुकीत मोठा पराभव स्विकारावा लागला. असे असले तरी पक्षातील भारतीय वंशांच्या उमेदवारांनी मोठा विजय मिळवला आहे.

नवेंद्रू मिश्रा यांनी 21,695 मते मिळवत पहिल्यांदाच निवडणुकीत विजय मिळवला. याशिवाय प्रित कौर गिल, तनमजीत सिंह धेसी, विरेंद्र शर्मा, लिसा लैंडी, सिमा मल्होत्रा, वेलेरी वाझ या मूळ भारतीय वंशांच्या उमेदवारांनी देखील निवडणुकीत विजय मिळवला.

Leave a Comment