‘संस्कृतमुळे मधुमेह नियंत्रणात राहतो’, भाजप खासदाराचा दावा

(Source)

संस्कृत भाषा भारतातील सर्वाधिक जुन्या भाषांपैकी एक आहे. संस्कृत बोलण्याचे अनेक फायदे देखील सांगितले जातात. मात्र मध्य प्रदेशमधील भाजप खासदाराने संस्कृतचा जो फायदा सांगितला आहे, तो वाचून तुम्ही देखील हसाल. सतना येथील भाजप खासदार गणेश सिंह यांनी दावा केला आहे की, संस्कृत बोलल्याने नर्व्हस सिस्टम चांगली राहते व मधुमेह आणि कॉलेस्टॉल नियंत्रणात राहतो. त्यांनी अमेरिकेच्या एका संस्थेच्या संशोधनाचा संदर्भ देखील दिला.

संस्कृति युनिवर्सिटीज विधेयकावर लोकसभेतील चर्चे दरम्यान गणेश सिंह यांनी हा अजब दावा केला. ते म्हणाले की, अमेरिकेतील एका संस्थेने संशोधन केले आहे की, संस्कृत बोलल्याने नर्व्हस सिस्टम चांगली होती. एवढेच नाही तर मधुमेह आणि कॉलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहतो. त्यांनी हा देखील दावा केला की, नासानुसार कॉम्प्युटर प्रोग्रामिंग संस्कृतमध्ये करण्यात आली तर त्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत. त्यांनी सांगितले की, जगातील 97 टक्के भाषा या संस्कृतवर आधारित आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी देखील संस्कृतविषयी आपले म्हणणे मांडले. त्यांनी सांगितले की, इंग्रजीतील ब्रदर (भाऊ) आणि काऊ (गाय) सारखे शब्द संस्कृतमधून आले आहेत. प्राचीन भाषांच्या प्रमोशनमुळे दुसऱ्या भाषेंवर कोणतेही परिणाम होणार नाहीत.

Leave a Comment