पंकजा मुंडेंना पराभूत करण्याचे पाप तुमच्या मनात का आले?


बीड : भाजपमध्ये होत असलेली खदखद दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तच्या गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात बाहेर निघाली आहे. यावेळी बोलताना भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ज्यांना आम्ही मोठे केले, त्यांच्याकडून छळाची अपेक्षा नव्हती, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली. पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात पराभूत झाल्या याचे मला दु:ख आहे. तुमच्या मनात पंकजा मुंडेंना पराभूत करण्याचे पाप का आले? पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला.

गोपीनाथ गडावर येऊन राजकारणावर न बोलणे म्हणजे पायात बेड्या घालून पळायला सांगण्यासारखे आहे. सध्याचे भाजपचे जे चित्र दिसत आहे ते चांगले नाही. पंकजा मुंडेंना होणाऱ्या वेदना त्यांना सांगता येत नाहीत. गोपीनाथ मुंडे साहेबांची मुलगी आहे. या मतदारसंघात पराभूत झाली, याचे मला दु:ख आहे. माझे स्पष्ट मत आहे की, हे घडले नाही तर ते घडवून आणले. याठिकाणी पंकजा मुंडेंना पराभूत करण्याचे पाप तुमच्या मनात का आले? अजून किती दिवस हे सर्व सहन करायचे, असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारला.

पंकजा मुंडे पक्ष बदलणार नाहीत, पण माझा काही भरोसा नाही. पक्ष ज्यांनी मोठा केला आज त्यांना पक्षात गुदमरल्यासारखे का वाटत आहे? पक्ष सोडून द्यायला भाग पाडले जात असून तशी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. मुंडेसाहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रदेशाध्यक्ष केले. देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा शपथ घेतली. मंत्रीपदी असताना गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला मी औरंगाबादला जागा दिली. सरकार असताना पाच वर्षात स्मारक झाले नाही. सरकार गेले तरी स्मारक झाले नाही. पण नव्याने सरकार आले, त्यावेळी मुंडेसाहेबांच्या स्मारकाला दोन दिवसात मंजुरी मिळाली. त्यामुळे सरकार पुन्हा आले हे बरे झाले, असे एकनाथ खडसे म्हणाले.

Leave a Comment