पाकिस्तानात 4 हजार वकिलांनी हॉस्पिटलमध्ये घुसून केली तोडफोड

(Source)

हॉस्पिटलमध्ये तोडफोड आणि हिंसेच्या घटनेत पाकिस्तानमध्ये 250 वकिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉक्टरांचा बदला घेण्यासाठी वकिलांनी लाहोरच्या पंजाब इंस्टिट्यूट ऑफ कार्डियोलॉजीवर हल्ला केला. या घटनेत जखमी झालेल्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वकिलांचे म्हणणे आहे की, त्यांनी दोन आठवड्यांपुर्वी एका वकिलासोबत डॉक्टरांद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी असे केले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, वकील जसे हॉस्पिटलमध्ये घुसले तेव्हा तेथील डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णांना सोडून पळू लागले. जे डॉक्टर ऑपरेशन करत होते, ते देखील रुग्णांना सोडून पळून गेले. वकिलांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच घटना कव्हर करणाऱ्या पत्रकारांना देखील सोडले नाही.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हॉस्पिटलमध्ये तैनात पोलीस देखील तेथून पळायला लागले. वकिलांनी दरवाजे आणि खिडक्या तोडल्या. तेथील गाड्या फोडल्या आणि पत्रकारांचे कॅमेरे देखील तोडले.

या घटनेनंतर डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे गंभीर रुग्णांची परिस्थिती अजून खराब होत चालली आहे. उपचार न मिळाल्याने 2 महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एफआयआरनुसार, सुरूवातीला 250 महिला वकील हॉस्पिटलमध्ये आल्या. त्यानंतर हजारो वकील हातात बांबू आणि हत्यार घेऊन तेथे आले. या वकिलांवर अनेक कलमांसोबतच दहशतवादी विरोधी कायदा देखील लावण्यात आला आहे. जवळपास 4 हजार वकिलांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर रेंजर्स आणि पोलिसांनी परिस्थितीवर नियत्रंण मिळवले आहे.

Leave a Comment