मला कोअर कमिटीतून मुक्त करा : पंकजा मुंडे


बीड : परळीतील गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला. भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रकाश मेहता, महादेव जानकर, सुरेश धस, पाशा पटेल, बबनराव लोणीकर, अतुल सावे, हरीभाऊ राठोड, सूरजीतसिंह राठोड, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार, खासदार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर माहिती नाही. आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे. आज नाथाभाऊंनी मन मोकळे केले. मन मोकळे नाही केले तर ते विष बनते. अनेक भाषणे माझ्या जीवनात केली, पण मी मागील दोन महिन्यात बोलले नाही. मी गेली 2 महिने भाषण केले नाही. आता काय बोलावे असा प्रश्न पडतो. गरीबाच्या झोपडीत दिवा लागावा यासाठी मुंडे साहेबांचे काम होते. त्यांनी मला तेच पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्या झोळीत टाकले. माझे भाग्य की मी त्यांच्या पोटी जन्मले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे दबावाचं राजकारण खेळत आहेत कोणी म्हणाले, मी प्रदेशाध्यक्षपद, विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेते पद मिळवण्यासाठी दबाव, पण कोणत्याही पदाची मला अपेक्षा नाही. पदाच्या हव्यासावरुन जर आरोप होत असतील, तर कोअर कमिटीतून मी मुक्ती मागते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

जनसामान्यांपर्यंत मुंडेंसाहेबांसारख्या कार्यकर्त्यांनी मूठभर लोकांचा पक्ष पोहोचवला. आता जनसामान्यांचा पक्ष मूठभर लोकांच्या हातात आणून ठेवू नका. रिव्हर्स गियर टाकू नका. हा पक्ष राष्ट्रीय पक्ष असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. लोकशाही पद्धनीने भाजपमध्ये निर्णय होईल, तेव्हाच कोअर कमिटीत यायचे की नाही ते बघू, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

मुंडे साहेबांचा राजकीय प्रवास मृत्यूनंतरही सुरुच आहे. माझे भाग्य, मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला. माझे दुर्दैव, मला मुंडेसाहेबांना अग्नि द्यावा लागला. मी चिल्लर पराभवाने खचणारी नाही. माझ्याकडे 12 दिवस टीव्ही चॅनेलचे लक्ष असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. संजय राऊत 12 दिवसांपूर्वी रोज दिसायचे, संजय राऊत रोज बोलत राहायचे, ते जे बोलायचे ते त्यांनी करुन दाखवले. मी न बोलताही 1 तारखेनंतर टीव्हीवर दिसले, 1 तारखेनंतर माझ्याबद्दल लोक किती बोलत होते, असे पंकजा म्हणाल्या.

आवाज दाबू नका, झालं ना सगळं आता, मी एवढे सूत्र बघितले की, एवढे सूत्र हुशार होते तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतलेली तुम्हाला का कळले नाही? असा प्रश्न पंकजा मुंडेंनी माध्यमांना विचारला. गोपीनाथरावजींच्या हाती आजही जनसंघाचा झेंडा असून गोपीनाथरावांची समाधीही कमळावर आहे. माझ्यासाठी फाटक्या लोकांनी संघर्षयात्रा काढली होती, कधीच कोणाच्या पाठीत गोपीनाथ मुंडेंनी खंजीर खुपसला नाही. नाथाभाऊ बोलले ते खरे आहे. गोपीनाथरावांचे रक्त आळणी नाही, गोपीनाथरावांच्याही पाठीत खंजीर खुपसला, मला तुम्ही वाघीण म्हणता, विरोधकांना ते खुपते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे बेईंमान होणार नाही. आता भाजपने आत्मचिंतन करावे. आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे. मुख्यमंत्री माझा भाऊच आहे. गोपीनाथरावांच्या नावाने पदर पसरायचा नाही. 26 जानेवारीला गोपीनाथ प्रतिष्ठानचे कार्यालय, 27 जानेवारीला औरंगाबादेत लाक्षणिक उपोषण करणार अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली.

Leave a Comment