भाजप नगरसेविकेला भ्रष्टाचार प्रकरणी पाच वर्षांचा कारावास


मुंबई – २०१४ साली ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या भाईंदर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक २३ मधील भाजप नगरसेविका वर्षा भानुशाली यांना ठाणे न्यायालयाकडून पाच वर्षाची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

६ जून २०१४ मध्ये एका गाळ्याची ऊंची वाढवण्यासाठी व दुरुस्तीप्रकरणी वर्षा भानुशाली यांनी एक लाख साठ हजार रुपये लाच मागितली होती. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याचा पहिला हप्ता घेताना सापळा रचून भानुशाली यांना रंगेहाथ पकडले होते. जानकी हेरिटेज या त्यांच्या राहत्या घरातून ५० हजार रुपये घेताना त्यांना पकडण्यात आले होते.

ठाणे न्यायालयाने याप्रकरणी त्यांना पाच वर्षाचा कारावास व पाच लाख रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. २००७ मध्ये भानुशाली या भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सोबत एकाच पॅनलमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. आता देखील त्या भाजपच्या नगरसेविका असून भाईंदर पश्चिमच्या मुर्धा, राई, मोरवा,आंबेडकर नगर व दीडशे फूट भागातून प्रभाग २३ मधून निवडून आल्या आहेत.

Leave a Comment