पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार अनिल गोटे


मुंबई – आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या औचित्य साधून धुळेतील भाजपचे माजी आमदार अनिल गोटे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत.

विविध समीकरणामुळे अनिल गोटे यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही मतांनी पराभव झाल्यामुळे तब्बल ३ टर्म धुळे शहराचे आमदार असलेले अनिल गोटे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सक्षम लोकप्रतिनिधी धुळे शहर विकासासाठी हवा अशी मागणी आजही कायम असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश करून विधान परिषदेच्या मार्ग सुकर होऊ शकतो, हे लक्षात घेत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय गोटे यांनी घेतला असावा. दरम्यान राष्ट्रवादीकडेही शहरात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या राजीनाम्यानंतर सक्षम नेतृत्व नाही. राष्ट्रवादीला गोटे यांच्या प्रवेशानंतर पुन्हा नवीन उत्साह मिळून त्याचा फायदा जिल्हा परिषद निवडणुकींसाठी होऊ शकतो.

धुळे जिल्ह्याचे राजकीय समीकरण गोटे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे निश्चितच बदलणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला त्यांच्या राजकीय कौशल्याचा फायदा निश्चितच होऊ शकतो. गोटे यांची भाजपला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन निती आखत अनिल गोटेंचा समावेश केला असावा, त्यांना विधान परिषदेवर घेऊन आमदार केले जाणार असल्याचीही चर्चा आहे. तसे झाले तर पुन्हा भाजपला धूळ चारण्यासाठी गोटे सज्ज होऊ शकतात.

Leave a Comment