अजितदादांकडे अर्थखाते, जयंतरावांना गृहखात्याची जबाबदारी


देवेंद्र फडणवीस याच्या अल्पसरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनलेले अजितदादा पवार यांच्याकडे महाआघाडी सरकारमध्ये अर्थ खात्याची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा आहे. नवीन सरकारमध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी अगोदरच मंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याकडे गृह खाते सोपविले जाईल असेही सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले महाआघाडी सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार पाच दिवसाचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर म्हणजे १६ डिसेंबर नंतर करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून यात कोणाला किती व कोणती मंत्रीपदे मिळणार याच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे.

जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ यापूर्वी घेतली आहे. त्यांना नव्या मंत्रिमंडळात गृह खात्याची जबाबदारी सोपविली जाईल असे समजते. शिवसेनेचे एकूण ५६ आमदार असून त्यांना सरकारात १० मंत्रीपदे, राष्ट्रवादीचे ५४ आमदार त्यांना ७ मंत्रीपदे आणि एक उपमुख्यमंत्रीपद तर कॉंग्रेसचे ४४ आमदार असल्याने त्यांना स्पीकर सह सहा मंत्रीपदे दिली जाणार आहेत. खातेवाटप करताना प्रत्येक पक्षाच्या राजकीय गरजा आणि इच्छा लक्षात घेतल्या जाणार आहेत असेही समजते.

आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद वेगवेगळया पक्षांकडे ठेवण्याची प्रथा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र गृह खाते त्याच्याच अखत्यारीत ठेवले होते. नव्या सरकारांत शिवसेनेकडे नागरी विकास, उद्योग, सामान्य प्रशासन, जलसंपदा, वाहतूक आणि उच्च शिक्षण ही खाती येतील तर राष्ट्रवादीच्या पारड्यात गृह, अर्थ, वैद्यकीय शिक्षण अशी खाती येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कॉंग्रेसला महसूल आणि लोकनिर्माण खाती मिळतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment