वाराणसीतील या दत्त मंदिरात नुसत्या दर्शनाने दूर होतात व्याधी


हिंदू धर्मग्रंथात काशी किंवा वाराणसी ही शिव नगरी मानली गेली आहे. या नगरीत कुणालाही मृत्यू आला तर त्याला मोक्षप्राप्ती होते असाही विश्वास आहे. या नगरीत अनेक रहस्ये आहेत. याच नगरीतील ब्रह्म घाटावर एक छोटेसे पण अतिशय प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. देशभरात दत्तजयंती नुकतीच साजरी झाली. त्यानिमित्ताने उत्तर भारतातील या एकमेव प्रसिद्ध दत्त मंदिराची माहिती करून घेणे योग्य ठरेल. दक्षिण, पश्चिम भारतात दत्त मंदिरांची संख्या प्रचंड आहे मात्र उत्तर भारतातील हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते.

हे मंदिर प्राचीन आहे आणि २०० वर्षापेक्षा अधिक जुने असल्याचे येथे असलेल्या शिलालेखावरून समजते. दत्तगुरुंनी अजूनही देह त्याग केलेला नाही आणि रात्रंदिवस ते भारतभर संचार करत असतात अशी त्यांच्या भक्तांची भावना आहे. यामुळे आजही त्यांचे मनापासून स्मरण करणाऱ्यांना ते दर्शन देतात असा गाढ विश्वास व्यक्त केला जातो.

देशभरातील बहुतेक दत्त मंदिरात दत्ताची तीन मुखी मूर्ती दिसते पण वाराणसीच्या ब्रह्मघाटावर असलेल्या या छोट्या मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. रोज पहाटे मनकर्णिका घाटावर दत्तगुरू स्नानासाठी येतात असा विश्वास आहे. त्यामुळे या घाटावर दत्तगुरूंच्या चरण पादुका आहेत. दत्त मंदिरात जाऊन नुसते दर्शन घेतले तरी त्यामुळे अनेक व्याधीपासून मुक्ती मिळते असे सांगतात. विशेषतः पांढरे डाग, कोड विकार नुसत्या दर्शनाने बरे होतात असा अनुभव अनेक जण सांगतात.

Leave a Comment