थाई मसाजचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश


थायलंड मध्ये सुमारे २ हजार वर्षे जुनी असलेली थाई मसाज म्हणजे नुआड थाई परंपरा लवकरच युनेस्कोच्या अमूर्त जागतिक वारसा यादीत स्थान मिळविणार असून ही घोषणा एक दोन दिवसात केली जाईल असे समजते.

थायलंडच्या इतिहासाचा एक भाग असलेली ही मसाज पद्धती दोन हजार वर्षे जुनी असली तरी जगाला तिची ओळख १९६२ मध्ये झाली. रिक्लायनिंग बुद्धा स्कूल सुरु झाल्यानंतर ही वैशिष्टपूर्ण मसाज पद्धती जगासमोर आली. हे स्कूल वाट फो मंदिर परिसरात सुरु करण्यात आले होते. तेथे आजपर्यंत २ लाखहून अधिक जणांना या मसाज पद्धतीचे प्रशिक्षण दिले गेले असून जगातील १४५ देशात हे मसाजिस्ट त्यांची सेवा देत आहेत.


ही एक गहन मसाज थेरपी असून त्यात अंगठे, कोपरे, गुढगघे आणि पायाच्या मदतीने शरीराला मसाज दिला जातो. त्यात शरीरावरील विविध अॅक्युप्रेशर पॉइंट दाबले जातात आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन स्नायुतील वेदना कमी होतात. या मसाज स्कूलचे प्रमुख प्रीदा तंगयोंगतीतू म्हणाले मसाजिस्ट म्हणून लाखो लोकांना प्रशिक्षित केल्यामुळे त्यांना रोजगार मिळाला आहे. तुमचे हात आणि शरीराची योग्य जाण हे या प्रशिक्षणाचे दोन मुख्य आधार आहेत. थाई मसाजची आज जगभरात प्रसिद्धी झाली आहे.

Leave a Comment