परळीत भाजपच्या कमळाविना झळकले पंकजा मुंडेंचे हजारो बॅनर


बीड : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांच्यासह दिग्गज नेते यानिमित्ताने हजर राहणार आहेत. 12 डिसेंबर अर्थात उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.

विशेष म्हणजे भाजप पंकजा मुंडेंच्या या मेळाव्यातून गायब असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपचे कमळ दिसत नाही. भाजपचे झेंडेही मेळाव्याच्या ठिकाणी नसल्यामुळे पंकजांनी खरंच वेगळा मार्ग निवडला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडेंच्या भूमिकेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची उद्या 12 डिसेंबर रोजी जयंती आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उद्याच्या दिवशी स्वाभिमान दिवस असा नारा देत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. उद्याच्या कार्यक्रमानिमित्त लोकनेत्याला अभिवादन करणारे हजारो बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. पण यातील एकाही बॅनरवर भाजपचे चिन्ह नसल्यामुळे तर्कवितर्क काढले जात आहेत.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला अनुपस्थित होत्या. त्यानंतर रात्री बारा वाजून सात मिनिटांनी ट्विट करत पंकजा मुंडे यांनी समर्थकांना येत्या बारा तारखेला गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ ’12 डिसेंबर ‘ रोजी सकाळी 11 वाजता आपल्या सर्वांना ‘गोपीनाथ गड’ येथे आमंत्रण. तुम्ही सारे या.. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे आहे. तुम्ही ही या.. वाट पहाते’ असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Leave a Comment