मेरठमधील ‘हा’ जल्लाद देणार निर्भयाच्या दोषींना फाशी


नवी दिल्ली – दिल्लीतील बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. १६ डिसेंबरनंतर चारही दोषींना फाशी दिली जाऊ शकते. मेरठ येथील पवन जल्लाद याला दोषींना फासावर लटकवण्यासाठी फोन करण्यात आला होता. यासंदर्भात तिहार जेलमधून पत्र आल्याचे कारागृह महासंचालक आनंद कुमार यांनी सांगितले आहे. तर, फक्त दोनच जल्लाद उत्तर प्रदेशमध्ये आहेत. लखनऊमधील इलियास जल्लाद सध्या आजारी आहे.

निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये विनय, अक्षय, पवन आणि मुकेश हे चौघे जण दोषी आहेत. मंडोली जेलमध्ये ठेवण्यात आलेला दोषी पवन गुप्ताला तिहार जेलमध्ये हलवण्यात आले आहे. या प्रकरणातील बाकी तीन आरोपी तिहार जेलमध्येच आहेत. तिहारमधील जेल क्रमांक २ मध्ये पवन गुप्ताला ठेवण्यात आले आहे. अन्य दोषी मुकेश आणि अक्षय आहेत. तर, चौथा दोषी विनय शर्मा याला तिहारमधील जेल क्रमांक ४ मध्ये ठेवण्यात आले आहे.

सहा जणांनी १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर चालत्या बसमध्ये सामुहिक बलात्कार केला होता. पोलिसांनी या सर्वांना अटक केली होती. सहा पैकी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला बालसुधारगृहात तीन वर्षासाठी पाठवण्यात आले होते. तर याप्रकरणातील दुसरा आरोपी रामसिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. तर उर्वरीत चार दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.

Leave a Comment