महाआघाडी सरकारची गिनीज बुकात ‘स्थगिती सरकार’ म्हणून नक्की नोंद होईल


मुंबई – भारतीय जनता पक्षाने राज्यातील स्थगिती सरकारविरोधात भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असून विकासकामांना स्थगिती देण्यामध्ये पराक्रम महाविकास आघाडीचे सरकार करत आहे. त्यामुळे गिनीज बुकात नक्कीच महाराष्ट्र सरकारची ‘स्थगिती सरकार’ म्हणून नोंद होईल, असा टोला भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य नेते या बैठकीस उपस्थित होते. तर या बैठकीला पंकजा मुंडे या उपस्थित नव्हत्या. यावर पंकजा मुंडे या प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने बैठकीला उपस्थित नव्हत्या, असे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले आहे.

मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले, राज्याच्या हितासाठी, राज्याच्या विकासासाठी भविष्यातील नियोजन विरोधीपक्ष म्हणून ठामपणे पार पाडेल असा, निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. जनहितासाठी विरोधी पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने काम करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले आहे.

तर मुनगंटीवार यांना एकनाथ खडसे नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला असता, एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करण्याचे आम्ही बैठकीत ठरविले आहे. त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. खडसेंनी काही पुरावे सादर केले आहेत. त्यानुसार ज्या भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पक्षाविरोधात काम केले. त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Leave a Comment