फुलांचा गुच्छ दिला आणि ५ हजार दंड भरावा लागला


(सोर्स नवभारत टाईम्स)
देशात सध्या सिंगल युज प्लास्टिकबाबत सरकार जनजागृती करत आहे. महाराष्ट्र सरकारने जूनपासूनच सिंगल युज डिस्पोजल बरोबर सर्व प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातली असताना औरंगाबाद येथे नव्याने रुजू झालेल्या आयएएस अधिकाऱ्याला प्लास्टिक कागदात लपेटलेला फुलांचा गुच्छ दिल्याने संबंधित व्यक्तीला ५ हजार रुपये दंड भरावा लागल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी आयएएस अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची नेमणूक झाली तेव्हा त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. त्यातील महापालिकेचे कर्मचारी रामचंद्र महाजन यांनी पांडेय यांना पुष्पगुच्छ दिला. या गुच्छाला बाहेरच्या बाजूने प्लास्टिक कागद गुंडाळला गेला होता तेव्हा पांडेय यांनी त्यांना ५ हजाराचा दंड ठोठावला आणि महाजन यांनी तो भरला. घनकचरा व्यवस्थापन विभागाने त्याची रीतसर पावती दिली. या प्रकारची चर्चा बराच काळ सुरु होती असे समजते.

आस्तिककुमार पांडेय बीड येथे जिल्हाधिकारी होते तेव्हा पत्रकार परिषदेत प्लास्टिक कपातून चहा दिला गेला होता तेव्हा पांडेय यांनी स्वतः सुद्धा ५ हजार रुपये दंड भरला होता अशी त्यांची आठवण सांगितली जाते. यंदाच्या स्वातंत्रदिनी पंतप्रधान मोदी यांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर थांबविला जावा असे आवाहन केले होते.

Leave a Comment