जम्मू काश्मीर सीमेवर शेतकरी बुलेटप्रुफ ट्रॅक्टरचा करताहेत वापर


(सोर्स दैनिक भास्कर)
जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सांबा परिसरात शेतकरी बुलेटप्रुफ ट्रॅक्टरचा वापर शेतातील कामे करण्यासाठी करत असून या कामी त्यांना बीएसएफचे जवान सुरक्षा पुरवीत आहेत. यामुळे सिमेजवळची जमीन कसणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. या परिसरात पाकिस्तान कडून वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्याच्या घटना होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यात अनेक अडथळे येत होते त्यावर हा उपाय काढला गेला आहे.

नव्वदच्या दशकात खलिस्तान आंदोलन तीव्र झाले असताना पंजाब पोलिसांनी खास बुलेटप्रुफ ट्रॅक्टर तयार करून घेतले होते. त्यापूर्वी सुरक्षा विभागाने या वाहनाचा वापर कधीच केला नव्हता. मात्र या बुलेटप्रुफ ट्रॅक्टरमुळे १५ फुट उंचीच्या उस शेतात लपलेल्या खलीस्तानींचा पाडाव पोलीस करू शकले होते. आता पाकिस्तानी गोळ्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी या ट्रॅक्टरचा उपयोग होत आहे शिवाय शेतीची कामे पूर्ण करणे शक्य होत आहे.

यंदाच्या वर्षात एलओसी तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याच्या घटनात ५० टक्के वाढ झाली असून आकडेवारीनुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात भारत पाक एलओसीवर ९५० वेळा तर आंतरराष्ट्रीय सीमेवर ७९ वेळा असे उल्लंघन झाले आहे. एलओसीची सुरक्षा लष्करावर आहे तर आंतरराष्ट्रीय सीमेची सुरक्षा बीएसएफच्या हाती आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षात पाकिस्तानने २३०० वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केले असून सीमेवर दहशतवादी घुसविण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला आहे.२०१८ मध्ये असे ३२८ प्रयत्न झाले होते आणि त्यातील १४३ प्रयत्न यशस्वी झाले होते असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment