निर्भयाच्या अपराध्यांना फाशी देण्याची तिहार जेलमध्ये रंगीत तालीम


नवी दिल्ली : मंडावलीहून तिहार कारागृहात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला हलविण्यात आले असून जिथे इतर गुन्हेगार तुरुंगवास भोगत आहेत. राष्ट्रपतींनी निर्भया प्रकरणातील आरोपींचा दयेचा अर्ज नाकारल्यानंतर लवकरच सर्व दोषींना फासावर लटकविण्याची शक्यता आहे. त्यांना फासावर चढवण्याची तयारीसुद्धा सुरू झाली आहे.

आरोपींना 16 डिसेंबरला फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी रंगीत तालीम देखील करण्यात आली. पण, अद्याप जेल प्रशासनाकडे आरोपींना फाशी देण्याचे पत्र आलेले नाही. निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावलेल्या तिहारमधील दोषींची दया याचिका फेटाळण्यात आली आहे.

चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी सात वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयासोबत सामूहिक बलात्कार केला. दोषी ठरविण्यात आलेल्या सहा अल्पवयीन मुलांपैकी एकाला आता सोडून देण्यात आले. त्याचवेळी तिहारमध्येच एका आरोपी रामसिंगने आत्महत्या केली. उर्वरित चार दोषींना लवकरच फाशी देण्यात येईल. सूत्रांनी सांगितले की, तिहार जेल प्रशासनाने डमीमध्ये 100 किलो वाळू भरून चाचणी घेतली. याचा हेतू असा होता की, जर दोषींना फाशी देण्यात आली तर लटकवलेली विशेष दोरी त्यांच्या वजनाने तुटेल का?

फाशी देण्यासाठी जो दोर दोरखंड लागतो तो तयार करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचा वापर करावा लागतो. हा दोरखंड देशातील अतिशय मोजक्याच ठिकाणी तयार केला जातो. यासाठी बिहारच्या बक्सर कारागृहात दोरखंड तयार करण्याचे काम सुरू आहे. फाशीला लागणारे 10 दोरखंड तयार करण्याची ऑर्डर या कारागृहाला मिळाली आहे. त्याचा वापर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना फाशी देण्यासाठी केला जावू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment