‘या’ गावांची आहे हटके ओळख


भारत देशामध्ये अनेक बाबतीत विविधता बघावयास मिळते. प्रत्येक राज्य वेगळे, तिथली संस्कृती वेगळी, खानपान, पोशाखही वेगवेगळे. त्यामुळे प्रत्येक राज्याची आणि त्यांमधील शहरांची, गावांची देखील स्वतःची अशी एक खासियत आहे. पण भारतामधील काही गावे इतरांपासून नुसतीच वेगळी नाहीत, तर ‘ हटके ‘ आहेत. या प्रत्येक गावाची विशेषता इतकी खास आहे, की ही गावे खरीखुरी न वाटता, एखद्या काल्पनिक कथेतून उतरल्यासारखीच वाटतात.

पंजाब मधील जालंदर जिल्ह्यातील उप्पाला ह्या गावामधील प्रत्येक घराच्यावर पाण्याची टाकी आहे. पण ह्या पाण्याच्या टाक्या नेहमीप्रमाणे काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या सिंटेक्स च्या टाक्या नाहीत, किंवा मोठ्या सिमेंटच्या हौदासारख्या दिसणाऱ्या ही नाहीत. तर प्रत्येक घरावरील टाकी निरनिराळ्या आकाराची आहे. कुठे घोडा, तर कुठ विमान, कुठे मोठी बोट, तर कुठे चक्क रणगाडा .. अश्या अनेक आकारांच्या टाक्या घराघरावर पाहायला मिळतात. या टाक्यांना अतिशय सुंदर रित्या रंगविले जात असल्याने दूरवरूनही या टाक्या अगदी ठळक उठून दिसतात.

मलाना, हे हिमाचल प्रदेशातील फार प्राचीन गाव आहे. इतर गावांपासून हे गाव काहीसे आडबाजूला असून, या गावामधून चंद्रखनी आणि देव टिब्बा या शिखरांचे दर्शन होते. या गावातील रहिवासी, आपण सिकंदराचे वंशज असल्याचे सांगतात. या गावामधील पंचायतीची दोन अंगे आहेत. यांना ज्येष्ठांग आणि कनिष्ठांग असे म्हटले जाते. मलाना मध्ये जाणाऱ्या पर्यटकांनी तेथील रहिवाश्यांच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श जरी केला, तरी त्यांना दंड ठोठाविण्यात येतो. या गावामध्ये सम्राट अकबराची पूजा केली जाते.

धोखडा हे कच्छ प्रांतातील गाव तेथील दुधाच्या उत्पन्नाकरिता ओळखले जाते. पण या गावामध्ये दूध किंवा दुधाचे पदार्थ विक्रीकरिता वापरले न जाता, ज्यांच्याकडे गाई म्हशी नाहीत, अश्यांना मोफत वाटले जातात. या मुळे येथील रहिवाश्यांचे आपापसातील संबंध खूपच स्नेहाचे आहेत. पाचशे वर्षांपूर्वी येथे आलेल्या एका पीराने गावकऱ्यांना, दूध न विकता, ते गरजू लोकांना मोफत दिले पाहिजे अशी परोपकाराची शिकवण दिली. तीच शिकवण आज ही या गावामध्ये पाळली जाते.

कोडीन्ही हे केरळमधील गाव तेथे असलेल्या जुळ्या मुलांच्या संख्येमुळे प्रसिध्द आहे. या गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक दाम्पत्याला केवळ जुळी मुलेच होतात. हे असे का घडते याचा शोध वैज्ञानिक ही आजवर लाऊ शकलेले नाहीत. मूळचे या गावचे नसेलेल्या, या गावमध्ये बाहेरुन आलेल्या दाम्पत्याला देखील गावामध्ये आल्यानंतर जुळी मुळेच झाली. हे नक्की कसे काय घडते, याचे गूढ अजूनही कोणालाच उकललेले नाही.

हिवरे बाजार महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील एक ठिकाण आहे. दुष्काळामध्ये पिके जळून गेल्यामुळे, कर्जबाजारी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी या भागामध्ये आत्महत्या केल्या. पण हिवरे बाजार हे एक ठिकाण असे आहे, जेथील शतकरी गरिबीने गांजलेले नाहीत. या गावामध्ये साठच्या वर कोट्याधीश शेतकरी आहेत. भारतामधील सर्वात समृद्ध गांवांमध्ये हिवरे बाजाराची गणती केली जाते. रेन वॉटर हार्व्हेस्टिंग गेली काही वर्षे सातत्याने केले गेल्याने या गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष कधीच जाणवत नाही.

महाराष्ट्रामधील शेटफळ गावामध्ये प्रत्येक पाहुण्यासाठी प्रत्येक गावकऱ्याच्या घरामध्ये जागा आहे. पण हा पाहुणा कोणी माणूस नसून, नाग आहेत. शेटफळ गावातील प्रत्येक घरामध्ये नागाला राहण्यासाठी खास जागा तयार केलेली आहे. जवळजवळ प्रत्यक घरामध्ये कधी ना कधी नाग वास्तव्याला येत असतो. तरी ही सर्पदंशाची एकही घटना आजवर या गावामध्ये घडलेली नाही.

Leave a Comment