जीन हिलीआर्डची अद्भूत कथा


आपल्याला अचंबित करणाऱ्या अनेक घटना जगामध्ये घडत असतात. त्या नेमक्या कशा व का घडल्या याची कारणे काही वेळानंतर समजतात, तर काही घटना कशा घडल्या याचे उत्तर सापडतच नाही. १९८०मध्ये अशीच एक अद्भुत घटना घडली. एका अपघातामुळे, बर्फामध्ये गोठून मृत्यूच्या तोंडाशी जीन हिलीआर्ड ही वीस वर्षीय तरुणी पोहोचली, पण आश्चर्याची गोष्ट अशी की एवढ्या भयानक अवस्थेतून बाहेर पडून जीन खडखडीत बरी झाली. हे नेमके कसे घडले याचे उत्तर, तिच्यावर उपचार करणारे डॉक्टरही देऊ शकलेले नाहीत.

अमेरिकेमधील मिनेसोटा येथील लेन्ग्बी या ठिकाणची ही विचित्र घटना आहे. १९८०च्या डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेला जीन हिलीआर्ड आपल्या मित्र मैत्रिणींची भेट घेऊन आपल्या घराकडे निघाली होती. त्याचवेळी रस्त्यावर पसरलेल्या बर्फावरून जीन चालवत असलेली गाडी घसरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोल खड्ड्यामध्ये कोसळली. त्यावेळी तापमान शून्याच्या खाली बावीस फॅरेनहाइट इतके खाली घसरले होते. कार खड्ड्यामध्ये कोसळली तरी सुदैवाने जीनला कोणतीही गंभीर इजा झाली नव्हती. कारचा दरवाजा प्रयत्नपूर्वक उघडून जीन बाहेर आली. खड्ड्यातून वर चढून येऊन ती रस्त्यावर आली आणि तिचा अपघात ज्या ठिकाणी झाला तिथून काही अंतरावर तिच्या परिचयाचे लोक रहात असल्याने त्यांच्या घराकडे जीन चालत निघाली. रात्रीची वेळ, भयंकर थंडी आणि त्याच्या जोडीला बोचरे वारे असल्यामुळे जीनचे पाय गारठायला लागले. तशा अवस्थेतही जीन जवळजवळ दोन मैलांचे अंतर चालून गेली खरी, पण मित्राच्या घराजवळ पोहोचताच जीन खाली कोसळली. एवढ्या भयंकर थंडीतून चालून आल्याने जीनची शक्ती संपुष्टात आली होती. मित्राच्या घराचा दरवाजा समोर दिसत असतानाही तिथवर पोहोचण्याची ताकद जीनमध्ये उरली नव्हती आणि हळू हळू जीनची शुद्ध हरपली.

एवढ्या भयंकर थंडीमध्ये तशाच बेशुद्ध अवस्थेत जीन जवळजवळ सहा तास पडून राहिल्याने तिचे शरीर गोठून गेले. एखाद्या बर्फाच्या पुतळ्याप्रमाणे जीन भासत होती. सकाळी थोडेसे उजाडल्यानंतर जीनचा मित्र वॉली नेल्सन काही कारणाने घराबाहेर पडला असता, त्याला बर्फात गोठून पांढरीफटक पडलेली जीन दृष्टीस पडली. जीनचा चेहरा गोठल्याने एवढा पांढरा पडला होता की तिचा मृत्यू झाला असावा अशी नेल्सनची खात्री पटली. त्यानंतर नेल्सनने त्वरित तेथील सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधून तेथील डॉक्टरांना ही घटना सांगितली. जीनच्या परिवाराशीही संपर्क करून नेल्सनने त्यांनाही सर्व हकीकत सांगितली. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जीनला ताबडतोब रुग्णालयात हलविले खरे, पण तिच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार करायचे हे डॉक्टरांना समजेना. कुठल्याही प्रकारच्या उपचारांचा जीनला उपयोग होत नव्हता. तिचा श्वासोच्छ्वास अतिशय संथ गतीने होत होता आणि तिच्या हृदयाचे ठोके मिनिटाला आठ इतक्या धीम्या गतीने पडत होते.

जीनचे शरीर गोठून कडक झाले असल्यामुळे तिचे हातपाय हलविता येणे शक्य नव्हते किंवा इंजेक्शन देण्यासाठी सुई तिच्या शरीरामध्ये घुसविणे शक्य नव्हते. जीन वाचण्याची शक्यता नसल्याची चिन्हे दिसत होती. जीनच्या शरीराचे तापमान वाढविण्यासाठी तिच्या आसपास डॉक्टरांनी गरम पाण्याच्या पिशव्या ठेवल्या होत्या. पण जीन कुठल्याही उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. अखेरीस दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला जीनच्या तोंडातून आवाज उमटला. रात्रीपर्यंत जीनला हातपाय हळूहळू हलविता येऊ लागले. तिसऱ्या दिवसापर्यंत जीन आपल्या पायांवर उभी राहू लागली. एवढा वेळ बर्फात गोठूनही जीनला हिमबाधा झाली नव्हती या बद्दल डॉक्टरदेखील नवल व्यक्त करीत होते. अखेरीस ४९ दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर जीनला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एवढ्या भयानक अवस्थेत काही तास राहिल्यानंतरही जीनला त्यापासून कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही हे तिचे सुदैव आणि एक विलक्षण चमत्कारच म्हणावा लागेल.

Leave a Comment