चंद्रकांत पाटलांचा दावा, यापुढील निवडणुका स्वबळावरच


औरंगाबाद- साेमवारी औरंगाबादेत विधानसभा निवडणुकीनंतरचा आढावा व संघटनात्मक निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपतर्फे आयोजित मराठवाडास्तरीय बैठक झाली. आता भविष्यातील सर्व निवडणुका स्वबळावरच लढायच्या असल्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केले. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे शिवसेनेचा आता हिंदुत्वावरील दावा निरस्त झाला आहे. फक्त भाजपकडेच आता हिंदुत्वाचा ब्रँड आहे.

हिंदुत्वाला शिवसेनेने तिलांजली दिल्याने भाजपची जबाबदारी आता वाढली असून भाजपचे हिंदुत्व यापुढे अधिकाधिक निखरणार असल्याचा दावाही पाटील यांनी केला. मात्र बैठकीस भाजपच्या कोअर कमिटी सदस्या व माजी मंत्री पंकजा मुंडे गैरहजर होत्या. पंकजा या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गैरहजेरीची चर्चा चांगलीच रंगली होती. पण, त्या तब्येतीच्या कारणामुळे येऊ शकल्या नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष पाटील बैठकीनंतर पत्रकार परिषदेत म्हणाले, आता भाजप भविष्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा आणि लाेकसभा अशा सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे. एप्रिल २०२० मध्ये औरंगाबाद महापालिकेची निवडणूक असून, भाजप ही निवडणूकदेखील आपल्या ताकदीवर लढून विजय संपादन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यापूर्वीच्या योजना राज्यातील नवीन सरकार बंद करत असल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या योजनांना तिलांजली देणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. भाजपच्या पक्षपातळीवरील निवडणुकांची तयारी सुरू आहे. १० ते १५ डिसेंबरदरम्यान बूथप्रमुखांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ ते २० डिसेंबरदरम्यान मंडळ प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या जातील. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची निवड केली जाईल, असेही ते म्हणाले.

Leave a Comment