जगातला पहिला मोबाईल होता १ किलो वजनाचा


आज जगात हाताहातात मोबाईल फोन दिसू लागले आहेत आणि मोबाईल कंपन्या अनेक नवीन सुविधांसह दररोज नवीन नवीन मॉडेल्स बाजारात आणत आहेत. जगातला पहिला मोबाईल फोन वापरला गेला ती तारीख होती ३ एप्रिल १९७३. मोटोरोलाचे माजी उपाध्यक्ष व डिविजन मॅनेजर मार्टीन कुपर यांनी न्युयॉर्कच्या हिल्टन हॉटेल मध्ये प्रथम मोबाईलचा वापर केला खरा पण तेव्हा त्यांना हा मोबाईल इतकी प्रचंड क्रांती घडवेल अशी कल्पनाही आलेली नव्हती. या पहिल्या मोबाईलचे नाव होते डायना टीएसी ८००० एक्स.

त्याचे झाले असे की बेल लॅब्ज या कंपनीने सर्वप्रथम १९४६ साली मोबाईल फोनची कल्पना मांडली होती. या कंपनीचे एन्गेल या फोनवर काम करत होते. तेव्हा मोटोरोला आणि बेल लॅब्ज एकमेकांच्या प्रतिस्पर्धी होत्या. त्यामुळे कुपर यांनी पहिला मोबाईल कॉल एन्गेल यांनाच केला आणि ते म्हणाले, मी खऱ्या खऱ्या सेल्युलर फोन वरून बोलतोय. आपले नाव आता वर्तमानपत्रात झळकणार असेही कुपर म्हणाले. अर्थात मोटोरोलाने पहिला मोबाईल १९७३ मध्ये बनविला तरी ग्राहकांच्या हातात पडण्यास १९८३ साल उजाडावे लागले.

मोबाईलची कल्पना सर्वप्रथम बेल लॅब्जचा इंजीनिअर डग रिंग याने मांडली होती. त्यावेळी मोटोरोला मोबाईलवर काम करत होते पण ते शिकागोच्या पोलीस अधिकाऱ्याच्या विनंतीवरून असा काही फोन बनविता येईल का याचा विचार करत होते. कुपर यांनी तीन महिन्यात या फोनचा प्रोटोटाईप बनविला. तो १० इंच लांबीचा आणि १ किलो वजनाचा होता. त्याची बॅटरी फक्त २० मिनिटे चालत असे. कुपर माजी नौसैनिक आणि इंजिनिअर होते आणि १९५२ मध्ये त्यांनी मोटोरोला कंपनी जॉइन केली होती.

Leave a Comment