आता काय मोदींनी कांद्याची शेती करावी का ? – बाबा रामदेव


अहमदनगर – गीता जयंती आणि स्वामी गोविंदगिरी यांच्या 71 व्या जन्मदिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात योगगुरु रामदेव बाबा यांनी उपस्थिती दर्शवली. त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्या देशातील काही मुलांची शाळेतील कामगिरी चांगली नसते, त्यानंतर ते आपल्या कामात व्यवस्थित लक्ष देत नाहीत आणि त्यानंतर देशात बेरोजगारी, गरीबी, महागाई खूप वाढली असल्याचे म्हणत राहतात. देशासमोर खूप समस्या आहेत. पण, आपण यावर काय करू शकतो याचा विचार करायला हवा. समस्या मोजण्यापेक्षा त्यावर उपाय करण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले, लोक पंतप्रधान मोदींना बेरोजगारी, गरीबी, महागाईवरून दोष देत राहतात. कांद्याच्या वाढलेल्या दरांवरून लोकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. त्यामुळे आता मोदींनी कांद्याची शेती करावी का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सामान्य कुटुंबात जगातील ९९ टक्के लोक जन्माला आले, पण अशा लोकांनी प्रगती केली आहे. शिक्षणासाठी माझे फक्त पाचशे रुपये खर्च झाले आणि तुमच्यासमोर आज मी उभा आहे. असे काम तुम्ही करा की, सर्व जग तुमच्या मागे फिरून मला तुमच्या सारखे काम करायचे आहे असे म्हणेल, असे बाबा रामदेव म्हणाले.

तीस हजार विद्यार्थ्यांनी गीता जयंती आणि स्वामी गोविंदगिरी यांच्या 71 व्या जन्मदिनानिमित्त गीता परिवाराच्या वतीने श्रीमद् भगवद्गीतेच्या बारावा आणि पंधराव्या अध्यायाचे सामूहिक वाचन केले. यावेळी गीता संपूर्णपणे कंठस्थ असणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून गौरविण्यात आले. सरसंघचालक मोहन भागवत, स्वामी गोविंदगिरीजी, भाजपचे उपाध्यक्ष शामजाजू, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि गीता परिवाराचे कार्याध्यक्ष सजंय मालपाणी यांच्यासह मोठा जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित होता.

Leave a Comment