या दुकानात स्मार्टफोन खरेदी करा आणि मिळवा मोफत कांदा

सध्या कांद्याच्या किंमती आकाशाला टेकल्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तींना कांदा खरेदी करणे देखील आवाक्याच्या बाहेर गेले आहे.  मे महिन्यापासून कांद्याच्या किंमतीत वाढ होत आली आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याच्या किंमत 100-150 रुपयांच्या पलिकडे गेल्या आहेत. या परिस्थितीमध्ये तामिळनाडूमधील एका दुकानदाराने स्मार्टफोन विक्रीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. तामिळनाडूतील एक दुकानदार स्मार्टफोनच्या खरेदीवर एक किलो कांदा मोफत देत आहे.

पट्टुकोट्टईमध्ये एसटीआर मोबाईल नावाचे दुकान चालवणारे सतीश म्हणाले की, जे त्यांच्या दुकानातून मोबाईल खरेदी करेल, त्यांना 1 किलो कांदा मोफत दिला जाईल. ते म्हणाले की, आम्ही आमच्या ग्राहकांना फायदा पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच ही ऑफर देत आहोत. सध्या तामिळनाडूमध्ये 1 किलो कांद्याचा भाव 140 रुपये आहे.

सतीश यांचे म्हणणे आहे की, ही ऑफर लागू केल्यापासून ग्राहकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. तर दुसरीकडे ग्राहक देखील म्हणाले की, त्यांना स्मार्टफोन आणि कांद्याची गरज होती आणि या ऑफरमुळे त्यांना दोन्ही गोष्टी मिळाल्या. या आधी कोणत्याही दुकानदाराने अशी हटके ऑफर दिली नव्हती.

 

 

Leave a Comment