मराठवाडा विभागीय बैठकीला उपस्थित राहणार नाहीत पंकजा मुंडे !


औरंगाबाद : माजी मंत्री पंकजा मुंडे या भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती स्वत: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. भाजपच्या मराठावाडा विभागीय बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित राहणार नाहीत, त्यांची तब्बेत ठीक नसून त्यांनी माझी परवानगी घेतल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर विविध विभागात आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. औरंगाबादेत आज मराठवाडा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मराठवाड्यातील भाजप नेते या बैठकीला उपस्थित आहेत. पण आज सकाळपासूनच एकच चर्चा होती, ती म्हणजे भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे या बैठकीला हजर राहणार की नाही.

सकाळीच हरीभाऊ बागडे यांनी पंकजा मुंडे या बैठकीला येणे अपेक्षित असून त्या येतीलही, असा विश्वास व्यक्त केला होता. पण पंकजा मुंडे या बैठकीला गैरहजर राहतील असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्वत: बद्दलची आणि पंकजांबद्दलची पक्षाविषयीची नाराजी जाहीर बोलून दाखवली असल्यामुळे पंकजा मुंडेंची नाराजी भाजप कशी दूर करणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

Leave a Comment