घरी दही लावताना


दही खाणे ही अतिशय उत्तम सवय आहे. कारण त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. दही प्रोबायोटिक असल्याने त्याचे सेवन करण्याचा सल्ला आयुर्वेदापासून ऍलोपॅथीपर्यंत सर्वच तज्ज्ञ देतात. पारंपरिक जेवणातही दही किंवा गोड ताक याचा समावेश असतोच. घरीच विरजलेले ताजे दही सेवन करण्यास उत्तम समजले जाते.

विरजण लावून केलेले दही – दही विरजण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. अर्धा लिटर दूध चांगले तापवून घ्या. मग ते बाजूला ठेवा. एका दुसऱ्या भांड्यात दोन चमचे दही घालून ते चांगले फेटावे. दूध कोमट झाल्यावर फेटलेल्या दह्यात घालून चांगले हलवून एकत्र करावे. एकत्र झाल्यानंतर भांड्यावर झाकण ठेवून ते एखाद्या अंधाऱ्या आणि गरम जागेत ठेवावे. रात्रभर हे भांडे असेच राहू द्या. सकाळी छान दही लागलेले असेल.

लाल मिरची वापरून दही – सुकलेल्या लाल मिरच्या देठांसह वापरूनही दही लावता येते. त्यासाठी अर्धा लीटर दूध तापवा. दूध कोमट झाले की त्यात दोन सुकलेल्या लाल मिरच्या देठासह न चिरता त्या दुधात घालाव्या. सुक्‍या मिरच्यांमध्ये लॅक्‍टोबसिली नावाचा जीवाणू असतो त्यामुळे दूधाची किण्वन प्रक्रिया होऊन दही लागते. मिरच्या घातल्यानंतर भांडे झाकून अंधाऱ्या उष्ण जागी ठेवा.

प्री-हीटेड मायक्रोव्हेव – घरी विरजलेले दही लवकर लागावे असे वाटत असेल तर मायक्रोव्हेवचा वापर करा. अर्धा लिटर दूध उकळून ते कोमट करून घ्या. दुसऱ्या मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये वापरण्यास योग्य भांडे घेऊन त्यात दोन चमचे दह्याचे विरजण फेटून घ्या. त्यात कोमट झालेले दूध घालून हलवून घ्या. चांगले हलवा. व्यवस्थित मिसळले गेल्यावर त्यावर झाकण ठेवा. आता ओव्हन 180 अंश सेल्सिअसवर दोन मिनिटे तापवून घ्या आणि बंद करून टाका. विरजण लावलेले दूध मायक्रोव्हेवमध्ये ठेवून झाकण लावून टाका. तीन ते चार तासात दही विरजेल. या दह्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Leave a Comment