मध्यप्रदेशातील ‘या’ जिल्ह्यात खंडणी दिल्यावरच परत मिळते म्हैस


भोपाळ – एखाद्या व्यक्तीचे अपहरण करुन त्या बदल्यात खंडणी मागितल्याच्या बातम्या तुम्ही अनेक वेळा वाचल्या किंवा ऐकल्या असतील. पण एखाद्या जनावराचे अपहरण करुन त्याबदल्यात खंडणी मागितल्याचे तुमच्या कानावर क्वचित आले असेल. पण असे खरचं घडत आहे. मध्यप्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात सर्रास म्हशींचे अपहरण केले जाते. मुरैना येथील शेतकऱ्यांना म्हशींचे अपहरण करुन त्याबदल्यात खंडणी मागितल्याच्या घटना नवीन नाहीत. जनावरांची चोरी चंबळ नदीच्या खोऱ्यात लपून बसलेले भामटे मध्यस्थांमार्फत करतात.

‘पनिहाई’ असे जनावरे चोरण्याच्या या पद्धतीला स्थानिक भाषेत म्हणतात. म्हशींची माहिती गावातीलच काही स्थानिक किंवा भामटे लोक चोरांपर्यंत पोहचवतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी येऊन भामटे म्हशींची चोरी करतात. त्यानंतर चोरटे मध्यस्थांमार्फत म्हशीच्या मालकाला खंडणी मागतात. जनावराच्या किमतीच्या २० ते ५० टक्क्यांपर्यंत ही खंडणीची रक्कम असते. परिसरातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांची जनावरे चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत मुरैना पोलिसांचे म्हशींची चोरी होत असल्याचे वृत्त खोटे असल्याचे म्हणणे आहे. या भागात पनिहाई सारख्या घटना घडत नाहीत. पण, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यावर पोलीस कारवाई करतील, असे पोलिसांनी सांगितले.

म्हशी चोरीच्या घटना मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेशमध्येही घडतात. म्हशींच्या अपहरणामुळे स्थानिक नागरिक चिंतेत आहेत. पनिहाई म्हणजे मध्यस्थामार्फत चोरून नेलेले जनावर खंडणी दिल्यानंतर माघारी देणे. राजस्थानमधून आलेल्या भामट्यांमुळे म्हशी चोरीच्या घटनांत वाढ झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

Leave a Comment