पाकिस्तानी कबुतरे भारताच्या प्रेमात


पाकच्या पंजाब प्रांतात भारतीय सीमेजवळ कबुतर पाळणारे कबुतरबाज या कबुतरांच्या भारतप्रेमामुळे हैराण झाले आहेत. ही महागडी आणि दुर्मिळ जातीची कबुतरे चक्क सीमा ओलांडून भारतात येत आहेत आणि पुन्हा घरी परतण्याचे नाव काढत नाहीत यामुळे कबुतरबाजांचे मोठे नुकसान होत आहे असे समजते.

एक्सप्रेस न्यूज मधील बातमीप्रमाणे वाघा, भानुचक, नरोड, लावानवाल व अन्य ठिकाणी मोठ्या संखेने कबुतरे पाळली जातात. यातील काही कबुतरे लाखो रुपये किमतीची आहेत. घराच्या छतावरून ही कबुतरे उडविली जातात मात्र वारे जोरात असतील तर ही कबुतरे सीमा पार करून भारताच्या हद्दीत येतात. अनेकदा ती परतत नाहीत तर काही वेळा दिशा चुकून भलतीकडे जातात. कबुतरबाज रेहान सांगतो त्याच्याकडे शेकडो कबुतरे आहेत त्यातील काही चांगलीच महाग आहेत. तो या कबुतरांना मुलांसारखे पाळतो. ही कबुतरे जेव्हा सीमेपार उडून जाताना पाहतो तेव्हा फार वाईट वाटते.


अनेकदा भारतीय सीमा ओलांडून भारतीय कबुतरेही पाक हद्दीत जातात. अशी कबुतरे मालक नसल्याने पाकिस्तानी कबुतरबाज सांभाळतात. किमती कबुतरांच्या पायावर मोहोर उमटविली जाते. यामुळे कबुतर ओळखणे सोपे जाते. पण अनेकदा अशी कबुतरे भारतीय हद्दीत आली तर त्यांना हेरगिरी करणारी कबुतरे मानले जाते आणि ती परत पाठविली जात नाहीत असेही समजते.

Leave a Comment