चीन मध्ये ई न्यायालये सुरु- रोबो न्यायाधीश


भारतीय न्यायालयात लाखोंच्या संख्येने प्रलंबित असलेल्या दाव्यांची चर्चा नेहमीच होत असताना चीन देशाने ई कोर्ट सुरु करून नवा आदर्श निर्माण केला आहे. ब्लॉकचेन, क्लाउड कॉम्युझाटिंग, सोशल मिडिया व आर्टिफीशीअल इंटेलिजन्स तंत्रज्ञान याचा वापर यासाठी करून घेतला जात आहे. चीनच्या हेन्ग्झौ शहरात २०१७ साली असे पहिले ई कोर्ट सुरु झाले होते. त्या पाठोपाठ आता बीजिंग आणि गुआंगझाऊ येथे अशी आणखी दोन ई कोर्ट सुरु करण्यात आली आहेत.

सर्वप्रथम सुरु झालेल्या हेन्ग्झौ शहरातील ई कोर्टात पहिल्याच महिन्यात १२०७४ दावे दाखल झाले आणि त्यातील १०३९१ दावे निकाली काढण्यात आले. या कोर्टात न्यायाधीश आर्टिफीशीअल इंटेलिजन्स तंत्राने काम करतो म्हणजे या न्यायालयातील जज रोबो आहे. त्याच्यासमोर वादी- प्रतिवादी व्हिडीओ चॅटचा वापर करून पेश होतात आणि दाव्याचा निर्णय ऑनलाईन दिला जातो.

ऑनलाईन व्यवसाय क्षेत्रातील वाद, कॉपीराइट संबंधी दावे, ई कॉमर्स संदर्भातील दावे तसेच दिवाणी दावे या कोर्टात दाखल होतात. त्यात मोबाईल दर, ई कॉमर्सशी संबंधित दाव्यांची संख्या सर्वाधिक आहे असेही समजते. दिवाणी दाव्यात केस ऑनलाईन रजिस्टर करता येते आणि दावेदाराला लॉग इन करून न्यायालयीन सुनावणीत सामील होता येते. सध्या सुरु असलेल्या तीन ई कोर्टात मिळून १,१८,७६४ दावे दाखल केले गेले त्यातील ८८४०१ दावे निकाली काढले गेले आहेत.

चीन मध्ये सोशल मिडिया मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्ही चॅट वर मोबाईल कोर्टाचा पर्याय उपलब्ध करून दिला गेला आहे. त्यानुसार नागरिक न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता फायलिंग, सुनावणी, पुरावे पेश करू शकतात. सुप्रीम पीपल्स कोर्टचे अध्यक्ष व मुख्य न्यायाधीश झाऊ किआंग म्हणाले यावर्षीच्या ऑक्टोबर पर्यंत ९० टक्के न्यायालयात किमान ३० लाख केसेस कोणत्या ना कोणत्या स्वरुपात ऑनलाईनवर असतील असा अंदाज आहे.

Leave a Comment