येत्या ४ वर्षांच्या काळात होऊ शकते महिला आयपीएल


नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांमध्ये आपले वेगळे असे स्थान बीसीसीआयने आयोजित केलेल्या आयपीएल स्पर्धेने निर्माण केले आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या देशांमधले अनेक खेळाडू उत्सुक असतात. मध्यंतरी क्रिकेट चाहत्यांकडून महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा भरवावी अशी मागणी होत होती. बीसीसीआयने २०१९ च्या हंगामात महिला क्रिकेटपटूंसाठी ३ प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन केल्यानंतर हा विषय पुन्हा मागे पडला. महिला क्रिकेट आयपीएलबद्दल आपले मत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

सौरव गांगुलीने नुकतीच इंडिया टूडे या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत गांगुली म्हणाला की, आपण सर्वांनी काही गोष्टी नीट समजावून घेणे गरजेचे असून महिलांसाठी आयपीएल स्पर्धा तुम्हाला भरवायची असेल, तर तेवढे खेळाडू लागतात. हे येत्या ४ वर्षांच्या काळात शक्य होईल आणि तेव्हाच महिलांसाठी ७ संघ सहभागी होतील, अशी आयपीएल स्पर्धा भरवता येईल. आपल्या अंतर्गत खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना स्थानिक राज्य संस्थांनी अजुन प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महिला खेळाडूंची संख्या ज्यावेळी १५०-१६० च्या घरात पोहचले ही स्पर्धा त्यावेळी भरवणे नक्कीच शक्य होईल.

१९ डिसेंबरला कोलकाता शहरात २०२० साली खेळवण्यात येणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव होणार आहे. या स्पर्धेसाठी Player Transfer Window बंद झाली असून सर्व संघमालकांनी आपल्या पसंतीच्या खेळाडूंना संघात स्थान दिले असून इतर खेळाडूंना करारमुक्त केल्यामुळे १९ तारखेला कोणत्या खेळाडूवर किती रुपयांची बोली लागते हे पाहणे विशेष ठरणार आहे.

Leave a Comment