टॅल्कम पावडरचा असाही उपयोग


टॅल्कम पावडर हे सौंदर्य प्रसाधन गेली अनेक दशके घराघरातून दिसत आहे. पण चेहऱ्यावर पावडर लावणे याखेरीज त्याचे इतर फायदे आहेत याची कल्पना फार थोड्या लोकांना असते. तुमच्या चेहऱ्यावरचा घाम शोषून घेऊन तुमची त्वचा नेहमी सुगंधी ठेवणारी टॅल्कम पावडर अजून किती तरी प्रकारे उपयोगात आणता येऊ शकते. टॅल्कम पावडर त्वचेवरील किंवा केसांवरील अतिरिक्त तेल शोषून घेते. त्यामुळे केस तेलकट वाटत असल्यास व शॅम्पूने केस धुण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यास केसांवर टॅल्कम पावडर भुरभुरावी. सावकाश केसांना चोळून अतिरिक्त पावडर हेअर ब्रशच्या मदतीने केसांमधून झाडून टाकावी. यामुळे केसांमधील अतिरिक्त तेल शोषले जाऊन केस मोकळे, फुललेले दिसतील.

डोळ्यांच्या पापण्यांवर बेबी पावडर लावली असता, पापण्या अधिक घनदाट दिसू लागतात. पापण्यांवर पावडर लावण्यासाठी इअर बड चा वापर करावा. आधी मस्कारा एकदा लाऊन घेऊन तो वाळल्यानंतर इअर बड च्या सहाय्याने बेबी पावडर लावावी. त्यानंतर मस्काराचा अगदी हलका दुसरा थर लावावा. त्यामुळे मस्करा एका जागी जमून न राहता व्यवस्थित पसरतो. तसेह लिपस्टिक सेट करण्यासाठीही टॅल्कम पावडर वापरता येते. टॅल्कम पावडर वापरल्याने लिपस्टिक सेट होण्यास मदत होतेच, त्याशिवाय ती अधिक काळ टिकूनही राहते. त्यासाठी आधी लिपस्टिक लाऊन घेऊन मग ओठांवर एक पातळसा टिश्यू पेपर ठेवावा. मग पावडर ब्रशच्या सहाय्याने थोडीशी टॅल्कम पावडर टिश्यू पेपरवर लाऊन घ्यावी. त्यानंतर टिश्यू पेपर काढून टाकून लिपस्टिक चा आणखी एक थर लावावा.

आपण समुद्र किनारी सहलीला गेलात तर समुद्राच्या पाण्यात आणि वाळूमध्ये खेळण्याचा आनंद आपण नक्कीच लुटत असणार. मात्र ही बारीक वाळू हातपायांना चिकटून राहते. अश्या वेळी टॅल्कम पावडर हातापायांना चोळल्याने ही वाळू भरकन उतरून जाते. उन्हाळ्याच्या दिवसात सतत घाम येत असल्याने आपण घातलेले कपडे त्वचेवर घासले जाऊन त्वचा लालसर होते व आग होऊ लागते. विशेतः मानेवर व मांड्यांवर असे लाल चट्टे उठतात. असे होऊ नये म्हणून त्वचेवर टॅल्कम पावडर भुरभुरावी. त्यामुळे कपडा त्वचेवर घासला जाणार नाही.

पायात जर सतत बूट घातले जात असतील, तर काही काळाने बूटांमधून दुर्गंधी येऊ लागते. असे होऊ नये या करिता शूज काढल्यानंतर हवेशीर जागेवर ठेवावेत, तसेच शूजच्या आतल्या बाजूमध्ये टॅल्कम पावडर घालून ठेवावी. शूज वापरायच्या वेळीस टॅल्कम पावडर झटकून टाकून मग शूज घालावेत.