चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरा हे फेस मास्क


चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने बाजारात उपलब्ध असतात. पण घरच्याघरी तयार करता येऊ शकणाऱ्या काही फेस मास्क्स मुळे त्वचेचे सौंदर्य तर वाढतेच, शिवाय यामध्ये वापरले जाणारे सर्व पदार्थ नैसर्गिक असल्याने त्यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारे अपाय ही होत नाही.

अर्धे केळे कुस्करून त्यामध्ये थोडेसे दूध घालावे. त्यामध्ये एक टेबलस्पून चंदनाची पावडर घालून अर्धा चमचा मधही घालावा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण वीस ते पंचवीस मिनिटे लावून ठेवावी. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. हा मास्क तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींकरिता अतिशय गुणकारी आहे. चंदनाच्या वापराने त्वचेवरील तेलकटपणा कमी होऊन चेहरा उजळतो, व केळ्याच्या वापराने त्वचेला आर्द्रता मिळते. त्याचप्रमाणे काही जास्वंदीची फुले रात्रभर थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवावीत. सकाळी फुले पाण्यामध्येच कुस्करून घेऊन ते पाणी गाळून घ्यावे. या पाण्यामध्ये तीन टीस्पून ओट्स घालून पेस्ट तयार करावी व हा फेस पॅक चेहऱ्यावर लाऊन वीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. या फेसमास्क मुळे त्वचेची अंतरबाह्य स्वच्छता होऊन त्वचा चमकदार दिसू लागते.

थोडेसे दही आणि मध एकत्र करून त्यामध्ये रेड वाईनचे काही थेंब टाकावेत. हा मास्क चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लाऊन ठेऊन मग त्यांनतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. या मास्क मुळे चेहऱ्यावरील त्वचेला आर्द्रता मिळते व उन्हामुळे त्वचेवरील टॅनही नाहीसा होतो. तसेच एका अॅवोकाडोचा गर कोरफडीच्या गरामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

एक टेबलस्पून मुगाची डाळ काही तास पाण्यामध्ये भिजत घालावी. मग पाणी काढून टाकून ही डाळ बारीक वाटून घ्यावी. ह्या डाळीच्या पेस्ट मध्ये एका टोमॅटोचा गर घालावा. हलक्या हाताने मसाज करीत ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेऊन मग कोमट पाण्याने चेहरा धुवावा. या फेस मास्क ने चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होऊन चेहरा उजळण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment