स्मृतिभ्रंशाबाबत असलेले गैरसमज


आपल्या भारत देशामध्ये स्मृतिभ्रंशाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या लाखोंच्या घरात आहे. स्मृतिभ्रंश अनेक कारणांमुळे उद्भवत असतो. त्यापैकी अल्झायमरचा विकार हे प्रमुख कारण असल्याचे दिसते. अल्झायमर हा मेंदुशी निगडीत आजार सतत वाढत जाणारा आणि रुग्णाची प्रकृती दिवसेंदिवस खालाविण्यास जबाबदार असणारा, असा आहे. या विकाराबाबत सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट अशी की या साठी कुठल्याही प्रकारचे उपचार जगभरामध्ये कुठेच उपलब्ध नाहीत. औषधांच्या मदतीने ह्या आजारापासून रुग्णाला होणारा त्रास काही अंशी नियंत्रणात ठेवता येत असला तरीही ह्या औषधोपचारांचा उपयोग फार काळ होत नाही. या आजाराचा त्रास केवळ रुग्णापुरताच मर्यादित न रहाता, रुग्णाची कधीही न सुधारली जाऊ शकणारी अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहण्याखेरीज दुसरे काहीही करु न शकणाऱ्या परिवारजनांसाठीही अतिशय तणावपूर्ण ठरू शकते. तसेच या आजाराबद्दल फारशी माहिती सर्वसामन्यांना नसल्यामुळे कित्येकदा नुसत्याच ऐकीव माहितीवर रुग्णाचे परिवारजन विसंबून असतात. त्यामुळे या आजाराबद्दल काही मूलभूत माहिती असणे अगत्याचे ठरते.

अल्झायमरची व्याधी फक्त वृद्ध व्यक्तींमध्ये दिसून येते हा एक मोठा गैरसमज आहे. सर्वसाधारणपणे अल्झायमर हा वयाची पासष्ट वर्षे उलटून गेलेल्या रुग्णांमध्ये पहावयास मिळतो, हे जरी खरे असले तरी चाळीशी किंवा पन्नाशी नुकतीच उलटून गेलेल्या व्यक्तींनाही अल्झायमर होऊ शकतो. याला अर्ली ऑनसेट अल्झायमर म्हटले जाते. यामध्ये अल्झायमरशी निगडीत काहीच लक्षणे सुरुवातीला पहावयास मिळतात. मेंदूचे कार्य मंदावणे, विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होणे, अगदी रोजची सवयीची कामेही करता येईनाशी होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.

अल्झायमर पासून बचाव करता येणे संपूर्णपणे शक्य आहे , हा या रोगाबद्दलचा आणखी एक गैरसमज आहे. अल्झायमर होणे कोणत्याही प्रकारे टाळता येऊ शकत नाही. पण ई, ब आणि क या जीवनसत्वांचे नियमित सेवन अल्झायमर होण्याची संभावना कमी करू शकते. नियमित व्यायाम आणि चांगले मनस्वास्थ्य यांच्या जोडीला ओमेगा ३ फॅटी अॅसिड्सने परिपूर्ण, संतुलित आहार हे ही अल्झायमर होण्याची संभावना कमी करण्यास सहायक आहेत.

स्मृतिभ्रंश किंवा विसराळूपणा म्हणजेच अल्झायमर हा ही एक गैरसमज आहे. वयपरत्वे विसराळूपणा वाढत असला तरी याचे कारण अल्झायमरच असेल असे नाही. अल्झायमर मुळे होणारा स्मृतिभ्रंश हा झटक्याने वाढत जाणारा असतो. अल्झायमरमध्ये होणाऱ्या स्मृतिभ्रंशाने रुग्णाला अगदी रोजच्या साध्या साध्या गोष्टींचाही संपूर्णपणे विसर पडतो. जसजसा रोग वाढत जातो तसतसे अन्न गिळणे, बोलणे, याही क्रिया रुग्णाला करता येईनाशा होतात.

अल्झायमरचे निदान लवकर करता येत नाही हा ही एक मोठा गैरसमज आहे. कुठल्याही आजारामध्ये जितक्या लवकर रोगाचे निदान होईल, तितके रुग्णासाठी फायद्याचे ठरते. अल्झायमरबाबतही हे खरे आहे. बहुतेक रुग्णांच्या बाबतीत अल्झायमरचे निदान लवकर होत नाही कारण या रोगाच्या प्राथमिक लक्षणांबद्दल पुरेशी माहिती रुग्णाच्या परिवारजनांना नसते. त्यामुळे या रोगाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागताच योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment