दिल्लीतील अग्नितांडवात 43 लोकांचा मृत्यू


नवी दिल्लीः दिल्लीतील राणी झाशी रोडवरील एका कारखान्यात भीषण आग लागली असून ही आग अनाज मंडी येथील फिल्मिस्तानमधील कारखान्यात लागली आहे. आतापर्यंत 43 लोकांचा या भीषण आगीत मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करत सुरक्षित रित्या जवळपास 50 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. आग ज्या इमारतीत लागली ती इमारत तीन ते चार मजली असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

एलएनजेपी, राम मनोहर लोहिया, सफदरजंग आणि अन्य रूग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. आगीत जखमी झालेल्याबद्दलची माहिती लोक नायक रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर कुमार यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, जवळपास 14 लोक जखमी झाले असून जखमींवर डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या 30 गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत. या भागात घरांमध्ये कारखाने आहेत आणि तिथेच ही आग लागली.

वृत्तानुसार, हा संपूर्ण परिसर खूपच अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाला पोहोचण्यास बराच त्रास झाला. पिशव्या आणि प्लास्टिक संबंधित वस्तूंचे उत्पादन करण्याचा कारखाना येथे होता. ज्या लोकांना वाचवण्यात आले आहे, त्यापैकी काहींची प्रकृती खूप गंभीर असून त्यांना सफदरजंग रूग्णालयात दाखल केले आहे. ही आग सर्व जण झोपेत असताना लागली.

माध्यमांना उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुनील चौधरी यांनी सांगितले, आगीवर नियंत्रण मिळवले असून आतापर्यंत 15 लोकांना वाचवण्यात आले आहे. सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू असून या बचाव कार्यात अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. घटनास्थळी मोठ्या संख्येने अग्निशामक कर्मचारी आणि बचावकर्ते उपस्थित आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यासोबतच लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात येत आहे. आगीची काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून ज्यावरून स्पष्ट होत की आगीचे रूप किती रौद्र आहे.

Leave a Comment