जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्र्याविरोधात तक्रार दाखल


नवी दिल्ली – केंद्र सरकारला कांद्याच्या वाढत्या भाववाढ नियंत्रणात आणण्यात सपशेल अपयश आले असून यावरून जनतेची सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याविरुद्ध एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. राजू नय्यर यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथील न्यायालयात न्यायधंडाधिकाऱ्यांकडे पासवानांविरोधात फौजदारी तक्रार केली आहे. १२ डिसेंबर रोजी या तक्रारीवर सुनावणी होणार आहे. अॅड. मनोजकुमार सिंग यांच्यामार्फत मिठनपुरात राहणारे राजू नय्यर यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड विधान कलम ४२० (फसवणूक), ५०६ (धमकावणे), ३७९ (चोरी) अन्वये पासवनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पासवान यांनी एका वृत्तवाहिनीवर कांद्याच्या वाढत्या महागीवर केलेला दावा ग्राह्य नसल्याचे हेरत थेट न्यायालयात नय्यर पोहचले आहेत. पासवान यांनी कांद्याचा काळा बाजार होत असल्याने कांद्याचा तुटवडा भासत असल्याचा दावा केला होता. पासवान यांचा हा दावा म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार असून कांद्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले असताना त्यावर सरकार तातडीने उपाययोजना न करता जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप नय्यर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

Leave a Comment