केळ्याप्रमाणे केळीची साले ही गुणकारी


केळी आपल्या आरोग्याकरिता फायदेशीर आहेत हे तर आपणा सर्वांना ठाऊकच आहे. पण केळ्याप्रमाणे केळीची सालेही अतिशय उपयुक्त आहेत याची माहिती फारशी ऐकिवात नसते. संपूर्ण भारतामध्ये अगदी सहज उपलब्ध होणारे आणि सहज परवडणारे हे फळ आहे. पण हे फळ खाऊन याची साले कचऱ्यात टाकण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती करून घेणे अगत्याचे आहे.

सतत चहा, कॉफी, किंवा प्रोसेस्ड पेयांच्या सेवनाने अथवा धूम्रपानाने दातांवर पिवळसर रंग येतो. हा पिवळेपणा काढून टाकून दात मोत्यांसारखे पांढरे शुभ्र करून घेण्यासाठी कित्येक जणे डेंटिस्ट कडे जाऊन महागड्या प्रक्रिया करवून घेताना दिसतात. या प्रक्रियांना भरपूर पैसाही मोजावा लागतो आणि पुष्कळ वेळही खर्ची घालावा लागतो. केळ्याची साल दररोज आपल्या दातांवर चोळल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. हा उपाय आठवड्याभरासाठी दररोज करावा.

त्वचेवर कुठे मस किंवा चामखीळ असल्यास केळ्याची साल त्या ठिकाणी चोळल्याने काही दिवसातच मस किंवा चामखीळ नाहीसे होऊन, पुन्हा नव्याने उद्भाविण्याचा संभव कमी असतो. या करिता दररोज रात्री झोपण्यापूर्वी केळीची साल, मस किंवा चामखीळ असलेल्या ठिकाणी चोळावी किंवा केळीच्या सालीचे पोटीस रात्रभर चामखीळावर लावून ठेवावे. त्याने चामखीळ नाहीसे होण्यास मदत मिळेल.

केळ्याची साल हळुवार चेहऱ्यावर चोळल्यास चेहेऱ्यावरील मुरुमे पुटकुळ्या नाहीशा होण्यास मदत होते. हा उपाय दररोज साधारण एका आठवड्यापर्यंत करावा. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे कमी होत असल्याचे आढळून येईल. तसेच वयापरत्वे किंवा सतत उन्हामध्ये वावरल्याने, जास्त मानसिक किंवा शारीरिक थकवा आल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. केळीच्या सालाने चेहऱ्यावर हळुवार मसाज केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. केळीच्या सालीने केलेल्या मसाजमुळे त्वचेला आर्द्रता प्राप्त होऊन त्वचा चमकदार दिसू लागते. यासाठी केळीची साल चेहऱ्यावर चोळून त्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवावा.

कुठल्याही प्रकारची अंगदुखी जाणवत असल्यास त्या ठिकाणी केळ्याच्या सालीचे पोटीस बांधून ठेवल्यास दुखणे कमी होते. तसेच सोरायसिस सारख्या व्याधींमधेही केळ्याच्या सालीच्या मसाजने आराम मिळतो. डास किंवा एखादा किडा चावल्याने अंगावर लाली येऊन पुरळ येते. क्वचित प्रसंगी अंगाची आग ही होते. कधी नवी चप्पल किंवा बूट चावल्याने पायावर लाली येते. अशा वेळी केळीची साल त्या ठिकाणी चोळल्यास आग होणे बंद होते. तसेच पुरेशी झोप न झाल्यास किंवा बाहेरील प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होते. अश्या वेळी डोळ्यांवर केळ्याची साल थोड्या वेळाकरिता ठेवल्याने आराम पडतो.

चांदीची भांडी उजळण्याकरिता त्यांवर केळीची साल चोळावी. त्यामुळे चांदीची भांडी चांगली उजळून निघतात. केळीच्या सालीचा उपयोग करताना नेहमी ताज्या केळ्यांची साले वापरावीत. तसेच फार वेळ सोलून ठेवलेली साले वापरू नयेत. केळ्यांची साले वापरण्याकरिता कधीही फ्रीजमध्ये साठवून ठेऊ नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment