भारतीय कंटेंटवर नेटफ्लिक्सची मोठी गुंतवणूक


ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्स भारतात कंटेंटवर ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सीईओ रीड हेस्टिंगस यांनी शुक्रवारी सांगितले. एका पॅनल डिस्कशन कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या प्रश्नाला उत्तर देत असताना ते बोलत होते. हेस्टिंग म्हणाले, भारतीय कंटेंटला जगभरातून पसंती दिली जात आहे त्यामुळे भारतीय कंटेंट येथे डेव्हलप करून जगभरात तो पोहोचविण्याची योजना आम्ही तयार केली आहे. भारतात रेग्युलेटरी स्थैर्य आणि सेल्फ रेग्युलेशनची परवानगी आहे ही महत्वाची बाब आहे.

भारतीय कथा खुपच छान असतात असे सांगताना हेस्टिंग म्हणाले, लैला आणि सेक्रेड गेम्स सिरीज जगभर यशस्वी झाली असून लिटील भीम प्रसिध्द भारतीय कॅरक्टर आहे. यावर बनलेली सिरीज जगभरातील २.७ कोटी युजर्स पाहत आहेत. मायटी लिटील भीम ब्राझील, कॅनडा आणि अन्य देशातही लोकप्रिय आहे. सध्या युके मधून सर्वाधिक कंटेंट निर्यात होत आहे. नेटफ्लिक्सने जुलै मध्ये भारतात १९९ रु. चा सबस्क्रिप्शन प्लॅन सादर केला असून हा सर्वात स्वस्त आहे. त्यातून जून २०२० पर्यंत २७ लाख नवे भारतीय युजर्स मिळविण्याचे ध्येय नेटफ्लिक्सने ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment