पतंगबाजीचा मनोरंजक इतिहास


भारतात संक्रांतीला पतंग उडविणे हा मोठा सोहळा असतो. जानेवारी सुरु झाला की यंदा कोणते पतंग आणायचे याच्या चर्चेला उत् येतो. प्राचीन काळापासून माणसाला आपल्या आकाशात मुक्त उडता यावे याची आस होती आणि त्यापासून प्रेरणा घेऊन पतंग तयार केले गेले. सुरवातीला मनोरंजन म्हणून त्याकडे पहिले गेले असले तरी आता जगभरातील अनेक देशात पतंग उडविणे हा रिवाज, परंपरा आणि उत्सव स्वरुपात मान्यता पावला आहे.

जगभरात अनेक देशात वर्षभरात विविध वेळी पतंग उडविले जातात. मात्र त्यामागचा उद्देश बंधुत्व आणि सामाजिक सौहार्द हाच आहे. भारतात हजारो वर्षे पतंग उडविले जात असून काही जणांच्या मते चीन मधील बौद्धधर्मीय तीर्थयात्री भारतात येताना ही परंपरा घेऊन आले असावेत. संत नामदेवांच्या गीतांमध्ये पतंगाचे उल्लेख आहेत. मुघल काळात पतंग उडविण्याची शान अलग होती. बादशहा आणि शहजादे या खेळात उत्साहाने सामील होत असत.


हैद्राबाद, लाहोर शहरात पतंगाच्या काटाकाटीच्या खेळाला फार महत्व होते. महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली येथेही ठराविक काळात पतंग उडविण्याचे खेळ रंगतात. अनेक ठिकाणी पतंगासाठी वेगळी नावे आहेत. उत्तर भारतात रक्षाबंधन आणि स्वातंत्रदिनी पतंग उडविले जातात.

पूर्वी कागदाच्या चौकोनी तुकड्यापासून पतंग बनत. आता त्यातही विविधता आली आहे. प्लास्टिक, फायबर ग्लासपासूनही पतंग बनतात आणि विविध आकार, रंगांचे पतंग आकाश रंगीबेरंगी करून टाकतात. अहमदाबाद येथे दरवर्षी मकरसंक्रांतिला जागतिक स्तरावरचा पतंग महोत्सव होतो आणि तेथे चीन, नेदरलंड, युएसए, ऑस्ट्रेलिया, जपान, ब्राझील,चीन, इटली देशातून पतंगप्रेमी येतात. येथे पतंगाचे एक म्युझियम सुद्धा आहे.


ग्रीक इतिहासकरांच्या मते पतंग उडविण्याची प्रथा २५०० वर्षे जुनी आहे. पतंग उडविण्याची सुरवात चीन मध्ये झाली असे मानणारे मोठ्या संख्येने आहेत. असे सांगतात की चीनी सेनापती हान्सीज याने कागदाचा चौकोन कापून हवेत उडवून सैनिकांना संदेश दिला होता. त्यातून विविध रंगाचे कागद पतंगासाठी वापरले जाऊ लागले. चीन मध्ये दरवर्षी ९ सप्टेंबरला पतंगोत्सव साजरा होतो तर अमेरिकेत रेशमी कापड आणि प्लास्टिक पासून पतंग बनविले जातात आणि जून मध्ये पतंग स्पर्धा होतात. जपान मध्ये देवता प्रसन्न व्हावी म्हणून पतंग उडविले जातात आणि हा उत्सव मे महिन्यात होतो.
—————

Leave a Comment