
नवी दिल्ली : गृहमंत्रालयात वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी के. विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंदन तस्कर वीरप्पनचा आयपीएस के. विजय कुमार यांनी खात्मा केला होता. विजय कुमार वीरप्पनचा खात्म केल्यापासून चर्चेत आले होते. गृहमंत्रालयाने सध्या त्यांच्यावर नवीन केंद्रशासित प्रदेश जम्मु-काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी सल्ला देण्याची जबाबदारी सोपवली आहे.
वीरप्पनला यमसदनी धाडणाऱ्या अधिकाऱ्याला केंद्राकडून मोठी जबाबदारी
यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागार म्हणून विजय कुमार यांनी काम केले आहे. त्यांनी एक अधिकारी म्हणून यशस्वीरित्या स्पेशल टास्क फोर्सचे नेतृत्व केले आहे. त्याच बरोबर त्यांनी चंदन तस्कर वीरप्पनला ठार केले आहे. वीरप्पनची तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत होती.
1975 च्या बॅचचे कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनला ठार करणारे के. विजय कुमार हे अधिकारी आहेत. विजय कुमार हे मुळचे तामिळनाडूचे असून विजय कुमार यांनी वीरप्पनचा खात्मा केल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात आले होते. वीरप्पनचा खात्मा केला तेव्हा ते एसटीएफचे प्रभारी होते. एसटीएफने त्यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या वीरप्पनला ठार केले. यापूर्वीही अनेक केंद्रातील मोठ्या जबाबदाऱ्या विजय कुमार यांनी सांभाळल्या आहेत.
जेव्हा छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये सीआरपीएफच्या 75 जवानांची वर्ष 2010 मध्ये हत्या करण्यात आली होती. तेव्हा विजय कुमार यांची सीआरपीएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 1998 ते 2001 पर्यंत ते सीमा सुरक्षा बलमध्ये इंस्पेक्टर जनरल (आयजी) या पदावर होते.
