लवकरच जाहिर करेन पाडापाडी करणाऱ्या स्वपक्षातील नेत्यांची नावे


जळगाव: पक्षातील नेत्यांनीच पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडले, या आरोपावर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ठाम असून मी प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिल्यास पत्रकार परिषद घेऊन पाडापाडीचे राजकारण करणाऱ्या स्वपक्षातील नेत्यांची नावे जाहीर करेन, असा थेट इशारा खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिला आहे. भाजपमधील गृहकलह खडसेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे थेट चव्हाट्यावर आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे नाराज आहेत. या परिस्थितीत ते कधीही भाजपला रामराम ठोकू शकतात, अशा बातम्या येत असल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी जळगाव गाठले आहे. भाजपची विभागीय समितीची बैठक जळगावात सुरू असून खडसे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे वृत्त प्रथम आले होते. मात्र साडेतीन वाजताच्या सुमारास खडसे बैठकीला दाखल झाले आहेत.

खडसे यांनी बैठकीत सहभागी होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. आधीच्या बैठकीबाबत मला माहीत नाही, पण साडेतीन वाजता होणाऱ्या बैठकीचे आमंत्रण मला मिळाले होते आणि त्यानुसार मी वेळेत बैठकीला आलो असल्याचे खडसे म्हणाले. मी अस्वस्थ वा नाराज नसल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी खडसे यांनी गिरीश महाजन यांचे नाव घेत आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचे सांगितले.

दरम्यान गिरीष महाजन यांनी पाडापाडीचे राजकारण कुणी केले, याचे पुरावे असतील तर ते खडसे यांनी जाहीर करावेत, असे म्हटले आहेत. त्यानुसार माझ्याकडचे पुरावे मी नावानिशी जाहीर करायला तयार आहे. मी आता बैठकीला जात आहे. या बैठकीत अध्यक्षांनी मला पुरावे जाहीर करण्याची परवानगी दिली तर बैठकीनंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन मी सर्व पुरावे तुमच्यापुढे ठेवेन, असे खडसे माध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले. मी हे सगळे पुरावे आधीच प्रदेशाध्यक्षांना दिले असल्याचे खडसे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले.

Leave a Comment