एनकाऊंटरमधील आरोपींचे मृतदेह ९ डिसंबरपर्यंत जतन करण्याचे आदेश


हैदराबाद – तेलंगणा उच्च न्यायालयाने सरकारला पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणातील एन्काऊंटर करण्यात आलेल्या चारही आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरपर्यंत जतन करून ठेवण्याचे त्याचबरोबर आरोपींच्या शवविच्छेदनाची व्हिडिओ प्रत आज संध्याकाळपर्यंत मेहबूबनगर जिल्हा न्यायाधीशांकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

काल आरोपींना अधिक तपासाठी घटनास्थळावर आरोपींना नेण्यात आले होते. आरोपींनी त्यावेळी पोलिसांवर हल्ला केला. पोलीस एन्काऊंटरमध्ये यावेळी चारही आरोपींचा मृत्यू झाला. देशभरामध्ये त्यावरून एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता सरकारला उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.

आरोपींचे मृतदेह ९ तारखेला संध्याकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत जतन करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. तसेच जिल्हा न्यायालयाकडे शवविच्छेदनाची व्हिडिओ कॉपी पेन ड्राईव्ह किंवा सीडीमध्ये जमा करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. याबरोबरच मेबहुबनगर जिल्हा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांना जमा करण्यात आलेली व्हिडिओ क्लीप आणि इतर दस्ताऐवज उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे आज संध्याकाळपर्यंत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मेहबूबनगर जिल्हा रुग्णालयात चारही आरोपींचे शवविच्छेदन केले जात आहे. राज्याचे महाधिवक्त्यांनी शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख तसेच गांधी रुग्णालयातील न्यायवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली सुरू असल्याचे सांगितले. तसेच शवविच्छेदन व्हिडिओ रेकॉर्ड केले जात असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. देशभरातून आरोपींच्या एन्काऊंटरनंतर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पोलिसांच्या कारवाईचे अनेकांनी समर्थन केले तर काहींनी पोलिसांनी कायदा हातात घेतल्यावरून चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या कारवाईची अनेक नेत्यांनीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानेही याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

Leave a Comment