आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी आरटीओच पुरवणार वाहन

ड्रायव्हिंग लायन्सससाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये काही असेही असतात, ज्यांच्याकडे स्वतःची कार नसते. अशावेळेस त्यांना एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडे कार मागावी लागते अथवा भाड्याने घ्यावी लागते. अशा अर्जदारांची अडचण लक्षात घेऊन आता वाहतूक विभाग ड्रायव्हिंग टेस्टसाठी कार आणि दुचाकी वाहन एका ठराविक शुल्कात उपलब्ध करून देणार आहे.

वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी अर्जदारांकडे अनेकदा गाडी नसते, अशावेळी समस्या उद्भवते. अशा लोकांची मदत करण्यासाठी आम्ही क्षेत्रीय परिवहन कार्यालयातच (आरटीओ) एक कार सेवा सुरू करण्याची योजना बनवत आहोत. ही योजना सुरूवातीच्या टप्प्यात आहे.

या योजनेनुसार, वाहतूक विभाग खाजगी विक्रेत्यांशी भागिदारी करतील. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच योजना आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही सेवा स्वस्त असावी असा आमचा प्रयत्न आहे. सध्या शुल्काची रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. कारसाठी 200-300 रुपये आणि दुचाकी वाहनांसाठी 100 रुपये शुल्क असण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांने सांगितले की, ही सेवा स्वस्त असल्याने लोकांना नक्की आवडेल. हळुहळु सर्व आरटीओमध्ये ही सेवा सुरू केली जाईल.

Leave a Comment